औरंगाबाद/चौसाळा (रिपोर्टर) महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला पळवले. एअरबस, वेदांता-फॉक्सकॉन, सॅफ्रॉन असे प्रकल्प पळवण्यात आले. हे प्रकल्प कोणी पळवले हे तुम्हाला माहितीच आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली. आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार का, असा रोखठोक सवाल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.आदित्य ठाकरे आज मराठवाडा दौर्यावर असून दुपारी 2 नंतर ते बीड जिल्हात डेरेदाखल होणार आहेत . गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत तर चौसाळा येथे शेतकर्याशी संवाद साधणार आहेत.
शिवसेना युवानेते तथा माजीमंत्री आदित्य ठाकरे आज मराठवाडा दौर्यावर असून आज सकाळी त्यांनी औरंगाबादेत डेरेदाखल होताच सर्वप्रथम गुरूद्वाराला भेट देत दर्शन घेतले. पुढे त्यांनी एका मोर्चाला संबोधले, यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळे प्रकल्प गुजरातला पळवले. एअरबर, वेदांता, फॉक्सकॉन, सॅफ्रॉन असे प्रकल्प पळवण्यात आले आहे. हे प्रकल्प कोणी पळवले हे तुम्हाला माहित आहे. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे महाराष्ट्र द्रोह्यासारखे वागत आहे. आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अपेक्षा नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार का? असा सवाल उपस्थित करत अब्दुल सत्तार यांनी काल परवा केलेल्या राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आदित्य ठाकरे हे मराठवाड्यातील शेतकर्यांशी थेट संवाद साधत आहेत. काही शेतांमध्ये जावून नुकसानीची पाहणी करत आहेत. औरंगाबाद येथील नियोजीत कार्यक्रम आटपून दुपारी 2 नंतर ते बीड जिल्ह्यात डेरेदाखल होणार आहेत. पाडळशिंगी येथे शेतीची पाहणी करून आदित्य ठाकरे चौसाळा येथे शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी चौसाळा येथे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित झाल्याचे सांगण्यात येते. शेतकर्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आदित्य काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकर्यांच्या पाठीशी शिवसेना सातत्याने खंबीरपणे उभी असल्याचे आदित्य ठाकरेंनी औरंगाबादेत सांगितले.
सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याविषयी पत्रकारांनी विचाले असता आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी आक्रमक होत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले सत्तार असे बोलायची ही पहिलीच वेळ नाही. यापू्र्वीही त्यांनी विधाने केली आहेत. टीईटी घोटाळ्यात त्यांचे नाव आले. ओला दुष्काळ कुठे आहे, हे समोर आले नाही. ते शेतकर्यांना भेटले नाहीत. बांधावर गेले नाहीत. सुप्रियाताई, महिला खासदारच काय कुठल्याही महिलेला शिवीगाळ करणे हा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार आहे. आता त्यांच्या मनातले लोकांसमोर आले आहे. त्यांचा तातडीने राजीनामा घ्या, अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.