बीड (रिपोर्टर) देशात प्रथमच महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 डिसेंबर जागतिक अपंगदिनी करणार असल्याची माहिती आ. बच्चू कडू यांनी दिली. देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे ज्या राज्यामध्ये अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असणार आहे.
राज्य आणि देशपातळीवर लाखो दिव्यांग आपल्या भविष्याशी लढा देत आहेत, त्यांच्यासाठी केेंद्र आणि राज्य सरकारने अनेक वेगवेगळ्या योजना आखल्या असल्या तरी त्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहचल्या जात नाहीत. त्यांच्या अनेक अडीअडचणींना सोडवण्यासाठी ठराविक असे महत्वाचे मंत्रालय नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांसाठी मंत्रालय हवे, अशी मागणी होत होती अखेर काल मंत्रीमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकारने दाखवली. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंगदिन आहे त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करणार असल्याची माहिती आ. बच्चू कडू यांनी दिली.