पक्षासाठी दहा वेळा तुरुंगात जायला तयार -संजय राऊत
मुंबई (रिपोर्टर): सर्वप्रथम संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक करत असल्याचे सांगत संकटात जो सोबत असतो तोच खरा मित्र असतो, संजय हा माझा चांगला मित्र आहे, असं म्हणत शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कार्यप्रणालीवर आक्रमक होत टीका केली. केेंद्रीय यंत्रणा या केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत असल्याचे त्यांनी म्हटले. संजय राऊत यांना खोट्या केसमध्ये पुन्हा अटक होऊ शकते, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. राऊत ही आमची लांब पल्ल्याची तोफ असल्याचे ठाकरेंनी या वेळी म्हटले तर पक्षासाठी दहा वेळेस तुरुंगात जायला तयार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे, संजय ररूत, आदित्य ठाकरे यांची आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. तब्बल 102 दिवस तुरुंगात राहिलेले संजय राऊत हे काल जामीनावर बाहेर आल्यानंतर आज सकाळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते. सुरुवातीलाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजयच्या धाडसाचे कौतुक करत असल्याचे सांगत संजय हा माझा खरा मित्र आहे. संकट काळात जो सोबत असतो तोच खरा मित्र असतो. न्यायालयाने मान्य केलय की संजय राऊतांवर कारवाई चुकीची होती. केंद्रीय यंत्रणा पाळीवप्राण्यांप्रमाणे वागत आहे. अंगावर जा म्हटले की जात आहेत, केंद्रीय न्यायमंत्री किरयेन रिजूजू यांची काही वक्तव्ये आली, न्यायव्यवस्था अंकीत करण्याचा प्रयत्न होत आहे, हा गुन्हा होऊ शकत नाही का? याची दखल न्यायदेवता घेईलच. न्यायालयाचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले, बेकायदेशीर अटक, खोट्या केसेस टाकल्या जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. कालचा निर्णय म्हणजे त्यांच्यासाठी मोठा दणका आहे, पण आता खोट्या केसेसमध्ये संजय राऊतांना गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाबरून जे पक्षातून पळून गेले त्यांच्यासाठी हा मोठा धडा आहे, तोफ तोफच असते, ती मैदानात आणण्याची गरज नसते. संजय आमची लांब पल्ल्याची तोफ आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले तर संजय राऊत यांनी पक्षासाठी दहा वेळेस तुरुंगात जायला तयार असल्याचे सांगत ठाकरे कुटुंब हे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील हा विश्वास होता. तुरुंगातला एक तास हा शंभर दिवसांसारखा असतो, असे सांगून तुरुंगातले काही प्रश्न घेऊन आपण फडणवीसांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सध्या फडणवीसच चालवत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. इथे देशाची घटनाच गोठण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसेना एकच, ती उद्धवजींच्या नेतृत्वात, असंही संजय राऊतांनी या वेळी म्हटलं.