बीड (रिपोर्टर) घटस्फोटीत तरुणीला सातत्याने लग्नाची मागणी करत त्रास देणार्या तरुणाविरोधात तक्रार देण्यासाठी सदरील तरुणी पोलीस ठाण्याकडे निघाली असता तिच्यावर दगडाने हल्ला करत गंभीर जखमी केल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एस. महाजन यांनी दोषी धरून एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड. अजय तांदळे यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक असे की, शहरातील एमआयडीसी भागात राहणार्या पिडित तरुणीचे 2017 साली गणेश साठे यांच्यासोबत लग्न झाले होते. 2018 साली त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर पिडित फिर्यादी ही तिच्या आई-वडिलाकडे राहत होती. या वेळी आरोपी सुनील दत्तात्रय जाधव हा फिर्यादीचा पाठलाग करून तिला लग्नाची मागणी घालत होता. फिर्यादी सातत्याने त्याला नकार देत होती त्यावेळी सुनील जाधव याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 22 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुनील हा फिर्यादीच्या घरासमोर येऊन माझ्याशी लग्न कर म्हणत शिवीगाळ करू लागला. त्यावेळी फिर्यादी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी निघाली असता तिच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीच्या आईलाही मारहाण केली. या प्रकरणी त्यावेळी आरोपीविरुद्ध कलम 307, 354, 354 (ड), 324, 504, 506 भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल होत पोलिसांनी त्याला अटक केली होती. सदरचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक के.व्ही. भारती यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. या वेळी न्यायालयासमोर आलेले पुरावे, सहायक सरकारी वकील अॅड. अजय तांदळे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून सुनील जाधव यास न्यायाधीश एम.एच. महाजन यांनी एक वर्षाचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदरील प्रकरणात हे सरकारी पक्षातर्फे अजय तांदळे यांनी काम पाहिले.