बीड (रिपोर्टर) महावितरण कार्यकारी अभियंत्याला हाताशी धरून पिंपळनेर येथील अभियंत्याने सुडबुद्धीने कष्टकरी तंत्रज्ञ रविंद्र निसर्गंध यांच्यावर खोटे आरोप करत निलंबनाची कारवाई केल्याच्या निषेधार्थ महावितरण बीड संयुक्त कृती समितीच्या वतीने वीज कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन करत महावितरण कार्यालयाच्या दारात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत अधिक असे की, पिंपळनेर येथे कार्यरत असणारे कष्टकरी वीजतंत्र रविंद्र निसर्गंध यांच्या विरोधात तेथील इंजिनिअर बिरुदेव गोचिडे यांनी जाणीवपुर्वक सुडबुद्धीने खोटे आरोप लावत वरिष्ठांकडे कारवाईची मागणी केली. त्यानुसार बीड येथील कार्यकारी अभियंता योगेश बी. निकम यांनी दोषारोप पत्र निसर्गंन यांना दिले. त्यावर उत्तर देण्यासाठी निसर्गन यांनी मागवलेली माहिती देणे अवघड झाल्याने निसर्गन यांचे मागणी पत्र गायब करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. सदरची कारवाई ही अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप करत महावितरण बीड संयुक्त कृती समितीने आजपासून वीज कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन सुरू करत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत निसर्गन यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कामावर जाणार नाहीत, अशी भूमिका कर्मचार्यांनी घेतली आहे. या वेळी आंदोलनकर्ते कर्मचार्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.