जमीनीच्या वादातून मुळुकवाडी रक्ताळली
पुतण्याने केला चुलता-चुलतीवर कोयत्याने वार; वयोवृद्ध चुलता ठार; चुलती गंभीर
मध्यस्थी
करण्यास गेलेले अन्य दोघे जखमी
आरोपीला पोलिसांनी नेकनूरमध्ये केले जेरबंद
बीड/नेकनूर (रिपोर्टर) चुलत्याने पुतण्याचा खून केल्याची घटना दोन दिवसांपुर्वी वडवणी तालुक्यात घडत नाही तोच नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुतण्याने जमीनीच्या वादातून चुलता व चुलतीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात वयोवृद्ध चुलता ठार झाला तर चुलती मृत्युशी झूंज देत आहे. मध्यस्थी करण्यास गेलेल्या अन्य दोघा जणांवरही हल्ला करण्यात आल्याने तेही जखमी झाले. ही घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मुळुकवाडी येथे घडली. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हल्लेखोर पुतण्या पळून जाण्याच्या बेतात असताना नेकनूर पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुळुकवाडी येथील बळीराम मसाजी निर्मळ व रोहिदास विठ्ठल निर्मळ या चुलत्या-पुतण्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जमीनीचा वाद आहे. दोन दिवसांपुर्वी बांध कोरण्यावरून वाद झाला होता. आज सकाळी हा वाद पुन्हा उफाळून आला. पुतण्या रोहिदास निर्मळ याने चुलते बळीराम मसाजी निर्मळ (वय 75 वर्षे), चुलती केशरबाई निर्मळ यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले बळीराम निर्मळ ठार झाले. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या भावजाई कांताबाई हिराजी निर्मळ, चुलत भाऊ चोखाजी निर्मळ (वय 70) या दोघांनाही कोयत्याने मारहाण करण्यात आली. जखमींना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. केशरबाई यांच्या मानेवर, डोक्यावर आणि पाठीत कोयत्याचे गंभीर वार असल्याने त्यांना जवळपास चारशे टाके देण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले. घटना घडल्यानंतर आरोपी रोहिदास निर्मळ हा पळून जाण्याच्या बेतात असताना नेकनूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास जाधव, पानपाटील, पवार, बांगर, राऊत, दीपक खांडेकर, प्रशांत क्षीरसागर, ढाकणे यांनी पाठलाग करून जेरबंद केले. घटनास्थळी नेकनूर पोलीस दाखल झाले होते. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात येऊन पोलिसांनी जबाब नोंदवले. या घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी रक्ताचा सडा
पुतण्याने चुलता व चुलतीवर धारदार कोयत्याने अंधाधूंद वार केल्याने घटनास्थळावर अक्षरश: रक्ताचा सडा पसरल्याचे दिसून येते. चलता बळीराम निर्मळ हे ज्या ठिकाणी पडले होते तो सर्व भाग रक्ताने माखून गेला होता.
वृद्ध बळीराम जीव वाचवण्यासाठी आकांताने ओरडत होते
ज्या वेळी हल्लेखोर रोहिदास हातात कोयता घेऊन बळीराम निर्मळ यांच्यावर वार करत होता त्यावेळी बळीराम घराबाहेर पळत सुटले, जिवाच्या आकांतात वाचवा…वाचवा…वाचवा म्हणत मदतीसाठी याचना करत होते. लोक त्यांच्यापर्यंत पोहचतेपर्यंत रोहिदासने त्यांच्यावर अनेक वार केले होते.
हल्लेखोर
नेकनूरमध्ये जेरबंद
चुलता-चुलतीवर आणि अन्य दोघांवर कोयत्याने सपासप वार करून हल्ला करणारा आणि चुलता घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडल्याचे लक्षात आल्यानंतर हल्लेखोर रोहिदास हा घरी गेला. रक्ताने माखलेले कपडे काढले, कोयतं बाहेर फेकलं, कपडे बदलून तो फरार झाला. मात्र नेकनूर पोलिसांनी त्याला नेकनूरमध्येच जेरबंद केलं.