उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेत अडीच तासाची वाढ
उद्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज भरता येणार
ऑनलाईन अर्ज भरताना इच्छुकांनी दोन रात्र जागून काढल्या होत्या
बीड (रिपोर्टर) ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी तयार करण्यात आलेली वेबसाईय सातत्याने बंद पडत असल्याने गेले दोन दिवस इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठ रात्रंदिवस पंचायत इलेक्शन वेबसाईट सुरळीत होण्याची वाट पहावी लागत होती. या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र पाठवून ऑफलाईन अर्जाची मागणी केल्यानंतर आज निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याबाबतचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले असून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत होती. याबाबतही निवडणूक आयोगाने अडीच तास वाढवून ही वेळ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची केल्याने इच्छुक उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक असे की, राज्यभरात 7 हजारापेक्षा जास्त आणि बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने 28 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र गेले दोन दिवस ग्रा.पं.चे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याबाबत जी वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे ती आणि तिचे सर्व्हर सातत्याने डाऊन होताना दिसून आले आहे. इच्छुकांना रात्र जागून काढावी लागली. सर्व्हर बंद पडत असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संधी हुकते की काय, यामुळे गावगावच्या उमेदवारात धाकधूक वाढत होती. याची गंभीर दखल विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेऊन निवडणूक आयोगाकडे सदरचे अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याबाबत मागणी केली होती. यामागणीची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेऊन राज्यासह बीड जिल्ह्यातल्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना ग्रामपंचायत अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याबाबतचे आदेश देण्यात आले. सर्वप्रथम निवडणूक आयोगाने सकाळी आठ वाजता दूरसंचार प्रणालीद्वारे एसएमएस पाठवून संबंधितांना माहिती दिली व तात्काळ अकरा वाजण्याच्या सुमारास निवडणूक प्रणालीबाबतचा सुधारीत आदेश देण्यात आला. या आदेशामध्ये उेदवारी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत होती मात्र सुधारीत आदेशामध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याबाबत शेवटची तारीख 2 डिसेंबर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
सरपंच, ग्रा.पं.सदस्यांचे अर्ज तहसीलमध्ये मोफत
बीड तालुक्यातील होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आणि ग्रामपंचायत सदस्यांचे उमेदवारी अर्ज उपलब्ध करून दिल्याचे दूरध्वनीवर तहसीलदार सुहास हजारे यांनी सांगितले.