नागपूर (रिपोर्टर) शेतकर्यांचे प्रश्न, पीकविम्याचा मुद्दा, गगनाला भिडलेली महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आक्रमक पवित्रा घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला घेरणार आहे. ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर तब्बल 1 लाख लोकांचा मोर्चा काढून शिंदे-फडणवीसांना विविध प्रश्नांवरुन लक्ष्य करेल. विरोधी पक्षाचा अधिवेशनाचा पहिल्याच दिवशीचा आक्रमक पवित्रा पाहता संपूर्ण अधिवेशन वादळी ठरेल, यात शंका नाही.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हिवाळी अधिवेशन मुंबईत होत आहे. मात्र, यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्यात येत आहे. 19 डिसेंबरला अधिवेशन सुरु होईल. गेल्या चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीशी फारक घेतली, शिवसेना फोडली अन् भाजपच्या साथीने नवं सरकार स्थापन केलं. या सरकारला आता जवळपास चार महिने उलटून गेलेत. मात्र ओला दुष्काळाचा मुद्दा, पीक विम्याचा प्रश्न, महागाई, राज्यपालांची विधाने, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यावरुन विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. यासाठीच्या एकत्रित रणनीतीसाठी महाविकास आघाडीची बैठकही मुंबईत पार पडली आहे. (पान 7 वर)
शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा मोर्चा
अधिवेशनादिवशी काढण्यात येणार्या मोर्चासंबंधी माहिती देताना दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले, नव्या सरकारच्या कामावर राज्यातील जनता नाराज आहे. याचमुळे सरकारविरोधात जनतेमध्ये मोठा रोष आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात लाखो लोकांच्या साक्षीने हा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकार्यांवर विशिष्ट जबाबदारी देण्यात आलेली आहे.
पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवले
पुणे दौर्यावर असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांना ’स्वराज्य’संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. सततच्या वादग्रस्त वक्तव्याबंबदल त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवले गेले. यावेळी ’राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ’छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.