बीड (रिपोर्टर) काही दूरचित्रवाहिन्यांसह अन्य वृत्तपत्रांनी ‘राजकीय नेत्यांकडे विजेची थकबाकी’ या शिर्षकाखाली बातम्या प्रसारीत आणि प्रकाशीत केले. सदरचे वृत्त हे पुर्ण निराधार, चुकीचे व खोडसाळपणाचे आणि जाणीवपुर्वक बदनामी करणारे असल्याचे सांगत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे विज वितरण कंपनीची कुठलीही बाकी नसून ज्या ग्राहक क्रमांकाबाबत बाकीचा दावा केेला आहे त्याबाबतचे बेबाकी प्रमाणपत्र धनंजय मुंडेंनी समोर मांडले.
याबाबत वस्तूस्थिती मांडताना मुंडे म्हणाले की, ज्या शेतीमध्ये हे मीटर वापरले जात होते, ती मौजे मालनाथपुर (ता. परळी) येथील माझी शेती 2016-17 साली मी एका सोलर कंपनीला विकलेली आहे. तेथील वर नमूद ग्राहक क्रमांकाच्या मीटरवरील संपूर्ण थकबाकी 2019 च्या निवडणुकीपूर्वी पूर्णतः भरून दि. 01 ऑक्टोबर, 2019 रोजी महावितरणने बेबाकी प्रमाणपत्र दिलेले आहे.
त्याचबरोबर ती शेती विकल्याने व माझा तिथे कोणताही विजेचा वापर नसल्याने मी महावितरण ला संबंधित कनेक्शन कायमचे बंद करण्याबाबत दि. 15/09/2019 रोजी लेखी अर्जाद्वारे कळवले आहे. त्यामुळे सदर शेती मालकीची नाही, किंवा विजेचा कोणताही वापर अस्तित्वात नसताना वीजबिल थकबाकी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या अन्य शेतीमध्ये देखील मी सौरऊर्जा आधारित शेती पंप वापरतो. तसेच आमच्या शेतातील लघु सौरऊर्जा प्रकल्पातून निर्मिती करण्यात आलेली उर्वरित वीज महावितरणला पुरवली जाते, याचीही माहिती आपणास असावी. त्यामुळे विजेची थकबाकी असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार, चुकीचे व बदनामीकारक असून कृपया माध्यमांनी या प्रकारची वृत्त प्रसिद्ध करताना खातरजमा करून घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली.