Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाविनाकारण लोकांना मारू नका, कारण समजून घ्या पोलीस अधिकार्‍यांसोबत जिल्हाधिकार्‍यांची बैठक

विनाकारण लोकांना मारू नका, कारण समजून घ्या पोलीस अधिकार्‍यांसोबत जिल्हाधिकार्‍यांची बैठक


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दहा दिवसांचे लॉकडाऊन केल्यानंतर याला प्रचंड विरोध झाला. लोकांच्या भावना पाहता आज जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण लोकांना मारू नका, रस्त्यावर असणार्‍या व्यक्तीकडे बाहेर असण्याचं कारण आधी समजून घ्या, विद्यार्थी परीक्षेला जात आहे का ? एखादा व्यक्ती औषध आणण्यासाठी जातय का? एखाद्याला दवाखान्यात जायचे आहे का? हे कारण समजून घेतल्यानंतर त्याला जावू द्या, एखादा बनावट असेल तर त्याला समज देऊन वापस पाठवा, अतिताईपणा करू नका, अशी समज देत दहा दिवसांचे लॉकडाऊन जनतेला विश्‍वासात घेऊन यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी या वेळी दिल्या.

आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांची महत्वपुर्ण बैठक घेतली. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, निवासी उपजिल्हाधिकारी राऊत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागांचे डीवायएसपी उपस्थित होते. पोलीसांना सूचना देताना जिल्हाधिकारी जगताप म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला येत असताना त्याच्याकडील हॉल तिकिट, आधार कार्ड बघून त्याला परीक्षेला सोडा, प्रसंगी शंका आली तर त्याचा फोटोही काढून घ्या, काहीच कारण नसताना एखादा व्यक्ती बाहेर पडला असेल तर त्याला मारहाण न करता पोलीसी भाषेत समज द्या, प्रसंगी त्याच्यावर पोलीस कलमानुसार काही किरकोळ कारवाई करता येईल का बघा, परंतु मारू नका, पोलीस विभागाकडे काही विभागाचे पास काढण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे असे जे लोक पास काढण्यासाठी पोलीसांकडे येतील त्यांच्याशी सौजन्याने वागा आणि त्यांना लवकर पास कसा देता येईल याची कार्यवाही गतीने करा. विनाकारण पोलीस आणि शासनाबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण होईल, अशी कोणतीही कारवाई करू नका अशाही सूचना या वेळी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पोलिसांना दिल्या. याबाबत पोलीसांच्या काही अडचणी असतील तर त्याही त्यांनी या वेळी सोडवण्याचा प्रयत्न केला.

तहसील कार्यालयातील
क्रमांकावर संपर्क होत नाही

जिल्ह्यात दहा दिवसाचं लॉकडाऊन करण्यात आल्याने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांसाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली ठरवून दिली. प्रवासाठी अँटीजेन, आरटीपीसीआर यासारख्या चाचण्या बंधनकारक करण्यात आल्याने त्यासाठी परवान्याची गरज आहे. परवान्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले. या कक्ष प्रमुखांचे क्रमांक लागत नाही तर काही वेळा संबंधित कर्मचारी आपला फोन उचलत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!