कडेकोट बंदोबस्त, मतदारांची कसून तपासणी; दुपारपर्यंत 50 टक्के मतदान
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातल्या लिंबागणेश येथे आज सकाळी सातपासून ग्रामपंचायतीसाठी फेरमतदान सुरू झाले. कडेकोट बंदोबस्तात मतदारांची कसून तपासणी करत हे मतदान होत असून दुपारपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले आहे. विशेष म्हणजे आजच रात्री 8 वाजता ’आयटीआय’ बीड येथे मतमोजणीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
लिंबागणेश येथे 18 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 2 मधील ईव्हीएममधील सरपंच उमेदवार गणेश वाणी यांच्या शिट्टी चिन्हाच्या बटनावर फेव्हिक्विक टाकून बंद करण्यात आले होते. संबधित प्रकरणात सरपंच उमेदवार यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली होती. त्यामुळे मशिन दीड तास मतदान बंद होते. या मतदान केंद्रांवर इतर दोन केंद्रापेक्षा मतदान कमी झालेले असल्याने राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक 2 चे फेरमतदान घेण्याचे आदेश दिले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत 18 डिसेंबर रोजी अनुचित प्रकार घडल्यानंतर लिंबागणेश येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदानापूर्वी महिला व पुरुषांची तपासणी करूनच मतदान केंद्रात प्रवेश दिला जात आहे. सपोनि नेकनूर पोलिस स्टेशन विलास हजारे तसेच पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव ठाण मांडून बसले आहेत. लिंबागणेश येथे सध्या कडेकोट पोलिस बंदोबस्त असून, सर्व प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण 829 मतदान असून, 18 डिसेंबर रोजी 588 मतदान झाले होते तर आज दुपारपर्यंत 450 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून नेकनूरचे ठाणेप्रमुख विलास हजारे, पीएसआय विलास जाधव यांच्यासह नेकनूर पोलिस आणि लिंबागणेश चौकीतील पोलिस कर्मचारी मतदान ठिकाणी ठाण मांडून होते. 18 डिसेंबर रोजी 829 पैकी फक्त 588 मतदान झाले होते. मात्र आज दुपारपर्यंतच 450 मतदान झाल्याने 18 तारखेपेक्षा आज मतदानाचा टक्का वाढणार असल्याचे दिसून येते.