नागपूर (रिपोर्टर) राज्यपाल झाले भाज्यपाल.., महाराष्ट्राचे एकच म्हणणे द्या हाकलून हे बुजगावणे.. यासह अनेक घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवन परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी विधान भवनाच्या पायर्यांवर दोन बुजगावण्यांची हंडी फोडण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी काळ्या टोप्या फिरवत महाराष्ट्राचे बुजगावणे त्वरित हाकला, राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा.., चोर है चोर है राज्यपाल चोर है.. अशा घोषणा दिल्या. . तसेच शेतकरी जसे शेतात बुजगावणे उभारतात तसेच विधान भवनाच्या पायर्यांवर बुजगावणे मांडून विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार आंदोलन करीत सत्ताधार्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. बुजगावणे हे शेतमालाच्या संरक्षणाकरता शेतात उभारले जातात. पाखरांनी शेतमाल खाऊ नये असा त्यामागचा उद्देश्य असतो. राज्यातदेखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या रुपात दोन बुजगावणे आहे. यांच्यासमोर गायरान खाल्ली जात आहे, भूखंड चोरले जात आहे, महापुरुषांचा अपमान केला जात असून हे बुजगावणेरुपी सरकार गप्प बसलयं, अशी खरमरीत टीका यावेळी विरोधकांनी केली. आंदोलनकर्त्या आमदारांच्या घोषणाबाजीतून राज्यपालांबाबत आमदारांमध्ये किती असंतोष आहे हे दिसून येते. आंदोलन संपल्यानंतर त्या बुजगावण्याला लात मारून ते खाली पाडण्यात आले. या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रोहित पवार, वैभव नाईक, विकास ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह सर्व आमदारांचा सहभाग होता.
विधानसभा अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्कटदाबी -नाना पटोले
नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. पण हा अविश्वास प्रस्ताव वर्षाभराच्या आत आणता येत नाही असे सत्ताधार्यांकडून दाखले दिले जात आहेत. सहा महिन्यांपूर्वी मांडलेला विश्वास प्रस्ताव होता. हा अविश्वास प्रस्ताव आहे आणिआम्ही नियमानुसारच आणला आहे. दोन आठवड्यात सभागृहाच्या कामकाजात विरोधकांना जनतेचे प्रश्न मांडू देण्यात आले नाहीत. आमची मुस्कटदाबी केली, असे पटोले म्हणाले. विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले, हे अधिवेशन पर्यटनासारखं झालयं. या सरकारकडे मंत्री नाहीत, दोन हजार लक्षवेधी मांडल्या असं सांगितलं जातयं. पण लक्षवेधींना उत्तरं देताना मंत्री नाहीत. गेल्या दोन अधिवेशनात 78 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्यात, त्याला काही आधार नाही. राज्यपाल भवनात नियमबाह्य काम सुरू आहे. हे विषय अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना मांडले. त्याचे काही उत्तर नाही. गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड सरकार असल्याची टीका पटोले यांनी यावेळी केली.
विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव विधानसभेत दाखल करण्यात आला आहे. या ठरावावर 29 आमदारांच्या सह्या आहेत. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांची यावर सही नाही. विशेषत: अजित पवारांनी या ठरावाबाबत आपल्याला माहित नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आघाडीमध्ये बेबनाव असल्याचे बोलले जात आहे.