बीड (रिपोर्टर) सॉ मील परवाना नुतनीकरणासाठी तसेच कारवाई न करण्यासाठी 27 व्यापार्यांकडे प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे 54 हजाराची लाच मागून 50 हजार रुपये स्वीकारताना वनविभागाच्या फिरत्या पथकातील तीन कर्मचार्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यांच्यावर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिघांनाही काल न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.
वनपाल शेषेराव सातपुते, वनरक्षक संतोष जाधव, चालक बिभिशन भालेराव अशी लाच घेणार्यांची नावे आहेत. हे तिघेही वनविभागाच्या फिरत्या पथकात कार्यरत आहेत. सॉ मील परवाना नुतनीकरण करण्यासाठी सॉ मील असोसिएशनच्या पदाधिकार्यांकडून प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणे 27 जणांकडून 54 हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी पदाधिकार्यांनी जालना येथील एसीबी विभागाकडे लाचखोरांची तक्रार केली होती. 28 डिसेंबर रोजी दुपारी शहराजवळील कुर्ला रोडवर तिघा जणांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. या प्रकरणी पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.