गणेश सावंत
मो. नं. 9422742810
शेतकर्याच्या पोटी जन्मलेल्यांना जितकी स्वत:च्या पोटाची काळजी नसते त्यापेक्षा अधिक सर्वास पोटास लावणे आहे, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिद्धांताची घडोघडी आठवण येत असते. म्हणूनच शेतकर्याच्या कुटुंबातलं पोर अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज सातत्याने उठवण्याचा प्रयत्न करते. कधी कधी नव्हे तर नेहमीच तो आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रस्थापितांकडून, धनदांडग्यांकडून होतो. हे उघड सत्य महाराष्ट्रात कोणीही झाकू शकणार नाही. ज्ञान-विज्ञानाच्या या 21 व्या शतकातही प्रस्थापीतांनी प्रस्थापीतच राहावे, धनदांडग्यांनी धनदांडगच व्हावं अन् अन्य जणांनी अन्याय-अत्याचाराच्या छत्राखाली रिकाम्या पोटाने काम करावे, हा जो प्रस्थापीतांचा अप्पलपोटी होरा आहे हा समूळ नष्ट करण्याइरादे आणि रिकामं पोट असलेल्यांना आवाज देण्याहेतू शेतकर्याच्या पोराच्या मनगटाच्या बोटात जेव्हा पेन येतो, मस्तकामध्ये व्यवस्थेविरोधात चीड येते, सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाच्या न्याय-हक्काबद्दल ज्याचं मन, ज्याचं हृदय ‘तू उठ अन् हो आवाज या दुबळ्या जणांचा’ असं म्हणते तेव्हा शेख तय्यब सारखं धगधगीत रसायन त्या दुबळ्या जणांना अमृतासारखं मिळतं. गेल्या तीन दशकाच्या कालखंडात डोकावून पाहितलं, तर सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या वटवृक्षाचा इतिहास याची देही याची डोळा सांगताना वैयक्तिक मला अभिमान वाटतो.
कोण आहेत हे शेख तय्यब ?
या प्रश्नाचं उत्तर ‘खाली हात आये थे खाली हात जायेंगे’ म्हणणार्या जगदजेत्त्या सिकंदरची आठवण जशी पदोपदी अवघ्या जगाला येते तशी खाली हात आये है, खाली हात नही तो खाली पेट वालों के पेट में निवाला दालके जायेंगे, असे ठणकावून सांगणारे नागापूरसारख्या ग्रामातल्या कष्टकरी, शेतकरी शेख सिकंदर यांचे शेख तय्यब हे ज्येष्ठ पुत्र. उभं आयुष्य ज्या बापाने शेतात राबराब राबलं, रक्ताचं पाणी केलं अन् शेख तय्यब यांना शहरात शिक्षणासाठी पाठवलं… त्या बापाचं स्वप्न एवढच होतं, माझं पोरगं शिकावं, माझ्या घराला सुशिक्षीत बनवावं, ईश्वराच्या नाम:स्मरणात अल्लाहने सांगितलेल्या प्रत्येक वाटेवर त्यानं जावं अन् रंजल्या गांजलेल्यांची सेवा करताना पिडितांचा आवाज बनावा. होय, तो आवाज रिपोर्टर बनलाय. जिथं धनीकांनीच पेपर काढावा, तथाकथीत बुद्धीजीवींनीच माध्यमातून मत मांडावं, असा जो तथाकथीतांचा होरा होता. तिथं नागापूरसारख्या खेड्या गावातून आलेल्या आणि मिसरुटही न फुटलेल्या शेख तय्यब सारख्या पोराने वृत्तपत्राच्या जगतात पाऊल ठेवावं, वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज बनण्याहेतू धाडस करावं, हा 25 वर्षांपूर्वी साधासुधा निर्णय नव्हता. रिपोर्टरसारखं वृत्तपत्र विकत घ्यावं आणि तो चालविण्यासाठी शर्थीने प्रयत्न करताना स्वत:च्या हातातली घड्याळही कागदासाठी गहाण ठेवावी, ही दानत, हे दायित्व लहान नव्हतं. कुठंही दोन-पाच हजाराची नोकरी करून अथवा गाड्यावर फळ किवा पाव विकून जो उदरनिर्वाह करू शकत होता, जो व्यक्ती भंगार विकूनही आपलं घर चांगलं चालवू शकत होता, ज्या व्यक्तीकडे 25 वर्षांपुर्वी कारकुनाची नोकरी लागावी, यापेक्षा अधिक शिक्षण होते त्या व्यक्तीने भविष्याचा आर्थिक वेध न घेता पिडितांचा आवाज बनण्याचा हेतू अंगी बाळगला. म्हणजे हा निर्णय आतबट्ट्याचा आणि पदरात विस्तव घेण्यासारखा होता. त्यावेळीही अल्पसंख्याकाचा पेपर आहे, किती दिवस चालणार, पत्तरवाडी काढतय पोरगं, अशा नकारात्मक बिरुदावलीतून शेख तय्यब यांना हिणवण्यातही आलं, हिणवणारे कोण… ते तेच, ज्यांना वाटत होतं, आपल्या हातातली लेखणी बहुजन पोरांच्या हातात जाऊ नये. परंतु ते शेतकर्याचं पोर, त्यातही बापाचं नाव सिकंदर. त्या पोरानं हिनवणार्यांचे दात घशात घातले ते स्वत:च्या कर्तृत्व सिद्धीतून, दाणतीतून अन् दायित्वातून. आजपर्यंत आम्ही अनेकांवर लिहिलं. कष्टकर्यांचे, शेतकर्यांचे, शेतमजुरांचे, दिनदुबळ्यांचे प्रश्न या व्यासपीठावरून मांडले आणि हे मांडण्यासाठी गेली 25 वर्षे मला जो अधिकार दिला, मला जे स्वातंत्र्य दिले ते मी किती मोठा होईल यापेक्षा समाजाचे प्रश्न मांडताना समाजाचे प्रश्न किती सोडवले जातील या विचाराने आणि हा विचार तोच माणूस करू शकतो ज्या माणसात दायित्व आणि दानत असते.
तेच दायित्व तीच
दानत माझ्या संपादकात
हे गर्वाने नव्हे तर माजाने सांगायलाही मी मागे-पुढे पाहणार नाही. होय, मी गेल्या 25 वर्षांचा साक्षीदार आहे. रिपोर्टरच्या जडणघडणीतला एक छोटासा शिपाई आहे, रिपोर्टरचं वटवृक्ष तेव्हाच झालं जेव्हा माझ्या संपादकाने माझ्या समोर एक लक्ष्य ठेवलं. कमवून काय करायचं, म्हणत जो संपादक स्वत:च्या कर्मचार्याला अखंडपणे सांभाळतो, जो संपादक कर्मचार्यांना आपल्या परिवारातला मानतो, त्या संपादकाकडून अर्थांजन साठवणं अन् त्या अर्थांजनातून प्रस्थापीत होणं ही अभिलाषाही त्याच्या अंगी कधीही लागत नाही. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेल्या लोकशाहीचा जो विचार आहे तोच विचार केवळ वाचक मायबापांच्या बळावर रिपोर्टर चालतो तेव्हा संपादकाच्या आज पावेतच्या भूमिकेवर आणि त्यांच्या कर्तृत्व-कर्मावर. गर्व वाटणे साहजिकच. या 25 वर्षांच्या कालखंडामध्ये अनेक निवडणुका झाल्या, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या दरम्यान लोकांची भूमिका काय, लोकांना काय हवय, सर्वसामान्यांचे प्रश्न कोण सोडवणार, यासाठी थेट भूमिकेत बहुदा बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात हा पहिला संपादक असा असेल जो होय, आम्हाला हेच करायचं, हे जाहीरपणे आपल्या संपादकीयमधून मांडतो. अशा वेळी अनेकांचे मन दुखावले जाते, त्या मनांना काही दिवस काजळी येईल, सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानलिये नाही बहुमता, असे म्हणत जेव्हा सत्य कळेल तेव्हा ती काजळीही दूर होईल, असं मानून संपादक शेख तय्यब पुढे चालत राहिले. अनेकांनी अनेकदा अर्थांजनातून रिपोर्टरला खरेदी करण्याचाही प्रयत्न केला, ते अर्थांजन एवढं होतं, रिपोर्टरला दारिद्रय कधीही दिसलं नसतं, मात्र तिथही स्वाभिमान काय असतं, वृत्तपत्राची नीती काय असते, भूमिका काय असते आणि ती भूमिका सर्वसामान्यांसाठी घेतली म्हणून ते अर्थांजनही नाकारणारा वाघाचा नव्हे तर सिंहाच्या काळजाचा माणूस इथच सापडतो. आज अनेकांना असे वाटेल, रिपोर्टरने रिपोर्टरचे कौतुक केले खरे, परंतु गेल्या 25 वर्षांच्या कालखंडात रिपोर्टरसोबत जगताना सर्वांनाच नव्हे परंतु मी मांडलेल्या प्रत्येक गोष्टीत जे जे लोक सहभागी आहेत, सहभागी होऊन गेलेले आहेत, त्यांना तर हे सत्य नाकारता येणार नाही, काही आहेत, काही ईहलोकी गेले आहेत. परंतु सत्य इथेच आहे, वस्तूस्थिती इथेच आहे आणि वस्तूस्थिती माहित असणारेही सर्व व्यवस्थेमध्ये आहेत. हा सांगण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच, आज माझ्या
संपादकाचा वाढदिवस
ही गेल्या कित्येक वर्षांपासून मांडण्याचा प्रयत्न करतो. मात्र ते मांडू न देण्याचा अट्टाहास होत असल्याने आजपर्यंत मांडण्यात आले नाही. मात्र सत्य ते सत्य उफळून येतेच आणि तेच उफळलेलं जळजळीत सत्य आज मांडावं म्हणून हा शब्दप्रपंच. शेख तय्यब हे कुठलं रसायन आहे? हा प्रश्न मला जेवढा पडतो तेवढा त्यांचं कौतुक करणार्यांना आणि त्यांच्यावर नाराज असणार्यांनाही पडल्याशिवाय राहत नाही. समाजविश्वामध्ये काम करताना, सामाजिक धोरण स्वीकारताना समाजाचा हा जो डोलारा आहे तो एकसंघ कसा राहिल, सामाजिक दृष्टीकोनातून समाजाची भूमिका आणि पिडितांवरचा अन्याय व्यासपीठावर कसा येईल, शासन-प्रशासन व्यवस्था या सर्व प्रश्नांकडे कसे पाहिल हेच सातत्याने शेख तय्यब यांनी आपल्या वृत्तपत्रामधून पाहिले. लोकांना मोठ्यांच्या बातम्या आवडतात, एखाद्या हिराईनी पोटुशी राहिली तर ती बातमी होऊ शकते, परंतु माझा संपादक जेव्हा शहरात मच्छर वाढले आहेत, ही बातमी करायला लावून त्या मच्छरामुळे लोकांना किती त्रास होतो आणि त्यांचा त्रास माध्यमामार्फत समोर जेव्हा मांडला जातो तेव्हा ‘साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’ या वाक्यातून तो प्रश्न किती मोठा असतो हे उघड होतं. लोकांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचा आवाज असेल, उपोषण, मोर्चे, यापेक्षाही बातमी मागची बातमी….त्या पुढे जात वस्तूस्थितीची तिसरी बाजू ही संपादक शेख तय्यब यांनी सातत्याने मांडली. म्हणूनच आज शेख तय्यब हा माणूस
टपरीवाल्यापासून मॉलपर्यंत
जाऊन पोहचला. संपादकाने ऑफीसमध्ये बसून भरलेले रकाने पहावेत, आपल्याला जेवढा फायदा होतो तेवढ्याच रकान्यांवर लक्ष द्यावे, असा आजकालच्या भांडवलदारी वृत्तपत्रांचा सिद्धांत झाला. परंतु हा संपादक लोकांच्या सुख-दु:खामध्ये थेटपणे जाणारा आहे. विवाहकार्य असतील, अथवा एखाद्याचा दु:खद प्र्रसंग असेल, त्याठिकाणी हा माणूस जातो त्याचं सांत्वन करतो, आनंदाच्या ठिकाणी कौतुक करतो, तु पुढे चाल म्हणत मी तुझ्या पाठिशी आहे, असं जेव्हा राजकारणात, समाजकारणात आलेल्या तरुणांना धीर देतो तेव्हा त्या तरुणाला राजकारण, समाजकारणाची जी उमेद येते त्यातून नवे नेतृत्व घडते, हेच नेतृत्व शेख तय्यब यांनी अनेकांना घडवले. कधी-कधी मला प्रश्न पडतो, एक मनाने हळवा माणूस एवढा निर्णयक्षम कसाच असू शकतो. निर्णय घेण्याची कुवत, त्यांच्यात असलेला संयम, एखाद्या कामाबाबत त्यांच्या सोबतचा दृढ विश्वास, कर्तव्य कठोर राहताना घेतले गेलेेले निर्णय यातून पुरेपूर संपादक कसा आहे हे येथेच सापडतो. माझ्या या दानत, दायित्व अन् कर्तृत्वसिद्ध रसायनास वाढदिवसाच्या लक्ष…लक्ष… शुभेच्छा!!