बीड (रिपोर्टर) बनावट दारु तयार करुन लोकांच्या जिवाशी खेळणारा कुख्यात माफिया रोहित राजू चव्हाण (25,रा.नवनाथनगर, एमआयडीसी, बीड) याच्यावर एमपीडीएनुसार (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 5 जानेवारीला रात्री उशिरा ताब्यात घेऊन त्यास पोलिसांनी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात 6 रोजी पहाटे स्थानबध्द केले.
बनावट दारुचा कारखाना थाटून रोहित चव्हाणने वयाच्या बाविशीतच पोलिस यंत्रणेला आव्हान दिले होते. कायम स्थळ बदलून कारखाना उभारुन बनावट दारु तयार करत विक्री करण्याचा सपाटा त्याने लावला होता. अटकेनंतर जामिनावर सुटताच त्याने वारंवार बनावट दारुचे गुन्हे केले. मानवी शरीरास दुखापत पोहोचेल असे विषारी द्रव बनविल्याप्रकरणी कलम 328 नुसार त्याच्यावर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव बीड ग्रामीण ठाण्याचे पो.नि. संतोष वाळके यांनी पाठवला होता. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यामार्फत प्रस्ताव 2 जानेवारीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना सादर झाला. शर्मा यांनी 5 जानेवारी रोजी प्रस्ताव मंजूर केल्यावर रात्री 11 वाजता बीड ग्रामीण व गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या त्यास राहत्या घरातून उचलले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्यास औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके, गुन्हे शाखा निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे, हवालदार सुनील आलगट, अंकुश वरपे, गुन्हे शाखेचे हवालदार अभिमन्यू औताडे, शेख नसीर, मनोज वाघ यांनी ही कारवाई केली.
तीन पोलिस अधिकारी गोत्यात
रोहित चव्हाणमुळे आतापर्यंंत तीन पोलिस अधिकारी कारवाईच्या कचाट्यात अडकले. अंबाजोगाई ग्रामीणचे तत्कालीन पो.नि. वासुदेव मोरे यांचे निलंबन झाले. पेठ बीडमध्ये रोहित चव्हाणने उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांचा वाढदिवस साजरा केल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले तर सहायक निरीक्षक केदार पालवे यांना नियंत्रण कक्षात संलग्न केले होते.
रोहित चव्हाणचे असे आहेत कारनामे
बहिरवाडी शिवारातील त्याच्या कारखान्यावर धाड टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 86 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. अंबाजोगाई ग्रामीण, शिवाजीनगर ठाण्यातही त्याच्यावर गुन्हा नोंद आहे. दोन महिन्यांपूर्वीच बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील बनावट दारु प्रकरणात रोहित चव्हाणला अटक झाली होती.