बीड, दि. 9 (रिपोर्टर) : मानसिक आजाराचे प्रमाण वाढले आहे. वेळेतच तज्ञांचा योग्य सल्ला व उपचार भेटले तर रुग्ण या आजारातून बाहेर येऊ शकतो. अनेकदा मानसिक स्थिती खालावल्याने आत्महत्यासारखे टोकाचे प्रकार देखील घडतात. त्यामुळे टेली मानस केंद्रांतून मानसिक आजरांवर तज्ज्ञांमार्फत ऑनलाईन समुपदेशन व सल्ला दिला जाणार आहे. राज्यातील तीन टेली मानस केंद्रांपैकी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यामुळे जिल्ह्यासाठी एक टेलीमानस केंद्र सुरु झाले असल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्रांत टेली मानस सेंटर सुरु झाले असून 14416 या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर कुठल्याही मानसिक आजारांवर 24 बाय सात तास तज्ज्ञांकडून सुपदेशन व सल्ला मिळणार आहे. गरजेनुसार या ठिकाणी मानसरोग तज्ञांकडून उपचारही केले जाणार असल्याचे डॉ. सुरेश साबळे म्हणाले.तंबाखू, दारुचे व्यसन, मुलांमधील चिडचिडेपणा, निद्रानाश, कर्ज फेडण्याची चिंता आदी विविध कारणांनी मानसिक स्थिती खालावलेल्या व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक 14416 या क्रमांकावर कॉल करु शकतात. लोखंडीला यापूर्वीच मानसिक आजार व वृद्धत्व उचार केंद्र कार्यान्वित आहे. आता या ठिकाणी टेली मानस केंद्र देखील सुरु झाले आहे. मानसिक आजारांबाबत 14416 टोल फ्रि क्रमांकावर आठवड्यातील सातही दिवस व 24 तास ही ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु राहणार आहे. फोनवर समस्या सांगीतल्यानंतर लागलीच शास्त्रीय समुपदेशन केले जाईल. तसेच, गरजेनुसार या ठिकाणी उपचार देखील करण्यात येतील असे डॉ. सुरेश साबळे म्हणाले. या निमित्त शुक्रवारी (दि. 13) मानसिक आजार निदान व उपचार शिबीर देखील होणार आहे. शिबीरात जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहम्मद मुजाहेद मेंदूरोग, पारकिन्सोनिझम, नैराश्य, चिंता, डोकेदुखी, व्यसन, फिट्स, झोपेचे आजार, वृद्धांमधील विसरभोळेपणा, विद्यार्थ्यांमधील तणाव आदी आजारांची तपासणी करुन उपचार करणार असल्याचेही डॉ. सुरेश साबळे यांनी सांगीतले.
—–
सावंत यांच्यामुळे राज्यातील तीन पैकी जिल्ह्याला केंद्र
बदलती जिवनशैली व इतर कारणांमुळे मानसिक आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गोरगरिबांना मानसिक आजारांवरील उपचारासाठी पुर्वी दुरवर जावे लागत होते. सरकारी दवाखान्यांमध्ये मानसोपचार तज्ञांची संख्या मोजकी होती. खासगी क्षेत्रातही या तज्ज्ञांची संख्या कमीच आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांची अडचण होत असे. दरम्यान, लोखंडी सावरगाव येथे मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्र दोन वर्षांपूर्वीच कार्यान्वित झालेले आहे. जिल्ह्यातील वाढती शेतकरी आत्महत्यांची संख्या तसेच मानसिक आजारांच्या रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता जिल्ह्यात देखील मानसिक आजारावर सल्ल्यासाठी टेली मानस केंद्राची गरज असल्याचा परिपूर्ण प्रस्ताव आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना पाठविला होता, असे डॉ. सुरेश साबळे म्हणाले. मानसिक खच्चीकरण झालेल्या व्यक्तींना योग्य वेळी तज्ञांकडून सल्ला व मार्गदर्शन मिळाले तर आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे सरकारने राज्यात तीन टेली मानस केंद्र सुरु केले आहेत. ठाणे, पुणे व जिल्ह्यासाठी तानाजी सावंत यांनी लोखंडी सावरगावला एक टेली मानस केंद्र मंजूर केले. या ठिकाणी 20 तज्ञ समुपदेशक, एक चिकीत्सालयीन समुपदेशक, एक मानसशास्त्रज्ञांची नेमणूक करण्यात आली असून हे केंद्र कार्यान्वित देखील झाले असून याचा जिल्ह्यातील गोरगरिब रुग्णांना मोठा फायदा होणार असल्याचेही डॉ. सुरेश साबळे म्हणाले.