आहारावरचं माणसाचं जीवन अवलंबून असतं. चांगला आहार असणारे माणसं अनेक वर्ष टिकतात. जुन्या काळात आहार चांगला होता. त्यामुळे लोकांचे आयुष्यमान अनेक वर्ष असायचे. पुर्वीच्या लोकांना आजच्या सारखे विविध आजार होत नव्हते. खाण्यात भरड धान्यांसह भाजीपाल्यांचा वापर जास्त असणार्या लोकांचे शरीर चांगले सुदृड व बलवान असते. आजच्या नव्या जगात सगळं काही बदललं. आज फास्टफुडला महत्व आलं. लोक चालता, चालता वडपाव, बर्गर, पिज्जा याचा नाष्ट करतात, हे फास्टफुट आरोग्यासाठी घातक ठरु लागले. फास्टफुटमुळे बीपी, शुगर, कॅन्सर इत्यादी गंभीर आजार उदभवू लागले. शहराच्या ठिकाणी लोकांचा भर फास्टफुट खाण्यावरच असतो. ग्रामीण भागातील लोकांची जीवन शैली शहरी भागाइतकी बदलली नाही, पण ग्रामीण भागत ही फास्टफुडचा शिरकाव होत आहे. अनेक लोकांना पुर्वीच्या जेवणाची आवड निर्माण होवू लागली. ठेंचा, भाकर, कांदा लोक आवडीने खावू लागले.
भरड धान्याचं उत्पन्न घटलं !
भरड धान्य हे खाण्यासाठी चांगले आहे. पुर्वी शंभर टक्के भरड धान्यांनाचा वापर होत होता. त्याशिवाय इतर पदार्थ खाल्ले जात नव्हते. आज सगळी वेगळी परस्थिती निर्माण झालेली आहे. औद्योगिकरण वाढले. त्याच प्रमाणात पीक पध्दतीत बदल झाला. शेतकरी नगदी पिकाकडे वळले आहे. नगदी पिकातून चार पैसे मिळतात. त्यामुळे भरड धान्य लागवडीचे क्षेत्र आपसुकच कमी झाले. भरड धान्यातून पैसे मिळत नाही, हे भरड धान्य खाण्यापुरते लोक पेरणी करु लागले. देशात हारित क्रांतीमुळे बरेच बदल झाले. 1970 नंतर कापूस, ऊस, सोयाबीन इत्यादी पिकांची जास्त प्रमाणात लागवड होवू लागली. भरड धान्य पेरणी केल्यांनतर बाजारात त्याला तितकी किंमत मिळत नाही. आज ही ह्या धान्याला म्हणावा तितका भाव नाही. शेती ही विविध अंगाने केली जावू लागली. पुर्वी शेती ही फक्त खाण्यापुरती केली जात होती, आज तसं नाही. शेतीतून आर्थिक क्रांती केली जावू लागली. शेतीला उद्योगाची जोड देण्यात आली. त्यामुळे पुर्वीचे जी पिके होती ते पुर्णंता पाठीमागे पडत गेले. जुनं ते सोनं या म्हणी प्रमाणे, जुन्या पिकांनाच पुन्हा चांगला भाव येवू लागला. आज भरड धान्यांना ठरावीक वर्गात चांगली मागणी वाढू लागली, आजच्या नव्या पिढयांना भरड धान्य म्हणजे काय हेच माहित नसेल?
भरड धान्य किती प्रकारचे?
ज्वारी- ज्वारी हे भारतात सगळीकडे घेतलं जाणारं पीक आहे. कोरडवाहू भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. राज्यातील सोलापूर, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारी, पांढरी, पिवळी, लाल अशा विविध रंगात मिळते.
बाजारी- बाजरीला भरड धान्याचा प्रमुख म्हटलं जातं. कोरडवाहू जमीनीत कमी पाण्यात येणारं हे पीक आहे. यात हिरवी, लाल, तपकिरी अशा रंगाची बाजारी असते. डोंगरी भागात बाजारीची जास्त प्रमाणात लागवड केली जात आहे.
नाचणी- नाचणीमध्ये मोठ्या कॅल्शियम, लोह अशी खनिजं असतात. सुपरफुड म्हणुन ओळखली जाते. सध्या फक्त आदिवाशी, डोंगराळ भागात खास करुन कोकणात याचे याची लागवड केली जाते. नाचणी पांढरी, लाल, केशरी रंगात असते.
वरई- वरईचं पीक सह्यादी परिसर आणि कोकणात घेतलं जातं. डोंगर शेतीतील हे एक प्रमुख पीक आहे.
वरी- वरई सारखेच दिसणारे हे धान्य आहे. महाराष्ट्रातील काही भागात त्याची लागवड केली जाते.
राळा- याचं पीक प्रामुख्याने भाद्रपद महिन्यात घेतलं जातं. राळ्याचा भात चिविष्ट असतो. यात देखील वेगवेगळे रंग असतात. मराठवाड्यात याची पुर्वी मोठया प्रमाणात लागवड होत असं. आज हे पीक दिसत नाही.
कोदो- एकावर एक सात थर असणारं हे धान्य आहे. याचं वैशिष्टय म्हणजे, सालपट काढलं नाही तर हे अनेक वर्ष टिकतं. गडचिरोली, धुळे आणि कोकणात याची शेती केली जाते.
बर्टी- सर्वात कमी दिवसात येणारं हे पीक आहे. अतिपाऊस असलेल्या भागात हे पीक येतं.
ब्राऊनटॉप मिलेट – मुळचं भारतीय असलेलं हे धान्य सध्या फक्त दक्षिण भारतात घेतलं जातं. यातून भरपूर उर्जा मिळते, हे धान्य खाल्यानंतर अनेक तास भुक लागत नाही.
ही नऊ प्रकारची भरड धान्य असून या धान्यांची देशातील विविध भागात लागवड केली जात आहे.
मैद्याचे पदार्थ
तांदुळ, गहू आणि मैदाचे पदार्थ खाण्यात जास्त प्रमाणात वापरले जावू लागले. पुर्वी गव्हाचे उत्पन्न कमी होतं. त्यामुळे लोकांना गहू खाण्यास मिळत नव्हते. कधी तरी सणाला चपात्या खाण्यास मिळत होत्या. आज रोज चपात्या खाल्लया जातात. काहींना चपत्या खाल्याशिवाय जमत नाही. तांदळाचा आहारात वापर वाढला. वडापावचे जागोजागी स्टॉल लावलेले असतात. मुंबई, पुण्या सारख्या ठिकाणी कामाला जाणारे लोक वडापाव खावूनच कामाला जातात. ब्रेड, खारी, तोस याचा नाष्टा केल्याशिवाय लोक घराबाहेर पडत नाही. मैद्याचे पदार्थ अतिखाणे हे आरोग्यासाठी घातक आहे. पोटाचे विकास मैद्याच्या पदार्थामुळे बळवतात. पित्त, अॅसिडीटी यासारखे आजार मैद्याच्या पदार्थाने वाढले आहेत. जे आरोग्यासाठी घातक आहे. त्याच पदार्थाची बाजार मोठ्या प्रमाणात विक्री होवू लागली ही चिंताजनक बाब आहे.
ज्वारी आणि बाजारी
ज्वारी आरोग्यासाठी चांगली मानली जाते. ज्वारीचा हुरडा हिवाळ्यात आवडीने खाल्ला जातो. हुरडा पाटर्याचं आयोजन केलं जातं. ज्वारी हे पीक राज्यासह इतर राज्यात घेतलं जातं. मराठवाड्यात दगडी, माळदांडी इत्यादी नावाने ज्वारी ओळखली जाते. ज्वारी माणसांना खाण्यासाठी जशी चांगली आहे. तसच ज्वारीचा कडबा जनावरासाठी पोषक मानला जातो. सध्या ज्वारीला चांगला भाव आला. ज्वारीचं क्षेत्र कमी झाल्यामुळे ज्वारी महाग झाली. पुर्वी प्रत्येक शेतकरी ज्वारीची लागवड करत होते. आज ज्वारीचं क्षेत्र खुपच कमी झालेलं आहे. ज्या प्रमाणात ज्वारीचा पेरा कमी झाला. तशीच अवस्था बाजारीची झाली. बाजारी हे पीक पावसाळी आणि उन्हाळी म्हणुन ओळखले जाते. कोरडवाहू क्षेत्रात बाजरीच पेरली जात होती, पण जेव्हा पासून कापसाचे नवीन वाण बाजारात आले. तेव्हा पासून बाजारीचं पीक हाद्दपार झाल्यासारखंच झालं. आज बाजारी तुरळक ठिकाणी पेरली जाते. बाजारीचं पीक काढण्यास परवडत नाही, म्हणुन शेतकरी हे पीक लागवड करण्यास कानाडोळा करु लागले. काही शेतकरी खाण्यापुरती सुध्दा बाजारी पेरत नाही. एक हजार रुपये क्किंटल भाव नसणारी बाजारी आज तीन हजाराच्या पुढे गेली. खानावळीत ज्वारी, बाजारीची भाकर आवडीने खाल्ली जावू लागली.
भरड धान्य वर्ष
संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचं वर्ष हे भरड धान्य वर्ष म्हणुन साजरा करण्याचा निर्माण घेतलेला आहे. भारत सरकारने 2018 साली भरड धान्य वर्ष साजरं केलं होतं. देशात भरड धान्यांची लागवड जास्त प्रमाणात व्हावी अशी अपेक्षा केंद्र आणि राज्य सरकारची असते. तसं आवाहन शेतकर्यांना सतत केले जात असते. जगातील 131 देशामध्ये भरड धान्यांची लागवड होते. आफ्रीका आणि आशिया खंडातील 60 कोटीहून अधिक लोकांचं हे अन्न आहे. भारतात 138 लाख हेक्टरवर भरड धान्याचं पीक घेतलं जातं. आशिया खंडातील एकूण उत्पन्नाच्या 80 टक्के आणि जगाच्या उत्पन्नाच्या 20 टक्के भरड धान्य भारतात उत्पादीत केलं जात आहे. देशात 50 वर्षात भरड धान्य लागवडीचं क्षेत्र 56 टक्कयांनी कमी झालं आहे. भरड धान्यांची लावगड केल्याने जमिनीचा कस चांगला राहतो. आजच्या वेगवेगळ्या पीकांमुळे जमिनीचा पोत खराब होवू लागला. आजच्या पिकांना अतिरिक्त पाणी, खत याचा वापर जास्त प्रमाणात होत असल्याने त्यामुळे माणसाच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होवू लागला. भरड धान्य जसं आरोग्यासाठी चांगलं आहे. तसचं ते जमिनीसाठी सुध्दा चांगलं आहे. भरड धान्यांची लागवड वाढवणे ही आज एक गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनानेच प्रयत्न करणे गरजेचे आहे.