नवी दिल्ली (वृत्तसेवा) गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा व सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आजमंगळवारी होणार होती. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगातही शिवसेना व निवडणूक चिन्हांच्या दाव्यावर प्रत्यक्ष सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 14 फेब्रुवारीपासून घटनापीठासमोर सलग ही सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तसेच, व्हॅलेंटाईन डे दिवशी सुनावणी असल्याने सर्वकाही प्रेमाने होईल, असेही ते म्हणाले.
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादानंतरची संत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी थेट व्हॅलेंटाईन डे रोजीच घेण्यात येणार आहे. देशाच्या सरन्यायाधीशांनी ही सुनावणी पुढे ढकलल्याचे सांगितले. त्यावर, दोन्ही गटाच्या वकिलांनी हरकत न घेता, मान्यता दिली आहे. तसेच, ठाकरे गटाच्या 7 सदस्य खंडपीठाची मागणी अद्याप मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे, पुढील सुनावणी ही 5 न्यायाधीशांच्या खंडपीठात होणार की, 7 न्यायाधीशांच्या खंडपीठात याबाबत निश्चिती नाही. मात्र, सत्ता संघर्षाच्या पुढील सुनावणीसाठी अजून 1 महिना वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष व धनुष्यबाण हे चिन्हा कोणत्या गटाचे आहे, यावर अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षाचे नाव धनुष्यबाण चिन्ह गोठवून दोन्ही गटांना वेगवेगळे पक्षाची नावे व निवडणूक चिन्हांचे वाटप केले होते. ही केवळ अंतरिम सोय होती, यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी 20 लाखांवर कागदपत्रे सादर केलेली आहेत.