रस्ता सुरक्षा अभियान कागदावरच गुंडाळले; कुठलाही गाजावाजा न करता एकाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर रस्ता सुरक्षा अभियानाचे धडे दिले
आरटीओच्या या कार्यपद्धतीवर जनतेत संताप
बीड (रिपोर्टर) रस्त्यावर वाढत चाललेले अपघात, रस्ता सुरक्षा, वाहन चालकांसह पदचारी आणि प्रवाशांची काळजी घेण्या हेतू केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नांची परिकाष्ठा करत रस्ते सुरक्षाविषयी जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे धोरण अवलंबत असताना बीडचे आरटीओ कार्यालय याला अपवाद ठरत आहे. कुठलाही गाजावाजा न करता आरटीओ कार्यालयाने आज राष्ट्रीय सुरक्षा अभियान केवळ एका शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर राबवून कर्तव्यपुर्तीचा आव दाखवला. त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेही संतापजनक घोड चूक केली. बीड शहरात जे छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण म्हणून मैदान ओळखले जाते त्या मैदानाचे नाव आरटीओने सदरच्या पत्रिकेत बदलून जाणीवपुर्वक मल्टीपर्पज असे टाकले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बीडच्या आरटीओ कार्यालयाला आकस आहे का?असा संतप्त सवाल शिवभक्तांनी विचारून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रस्ता सुरक्षा अभियान घराघरात पोहचवण्याची सध्या नितांत गरज आहे. रोज कित्येक अपघात घडतात आणि त्या अपघातात अनेकांचा मृत्यू होतो. कित्येकांना अपंगत्व येतं. अशा परिस्थितीमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृती जास्तीत जास्त व्हावी, असे केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण असताना केवळ वसुलीबाजीत दंग असलेले बीडचे आरटीओ कार्यालय आणि तेथील अधिकारी सर्वसामान्यांची जनजागृती तर सोडा, छत्रपती संभाजीराजे यांची थेट अवहेलना करत असल्याचे दिसून येते. एकतर हे अभियान राबवण्याबाबत मोठा गाजावाजा करायला हवा होता, लोकप्रतिनिधी, पत्रकार, डॉक्टर, वकील, वाहन संघटनेचे पदाधिकारी, वाहन चालक यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण आणि सर्वसामान्यांना रस्त्यावर वाहन चालवताना मार्गदर्शन होणार आहे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन करायला हवे होते, मात्र बीडच्या आरटीओ कार्यालय आणि तेथील अधिकार्यांनी रस्ता सुरक्षा अभियान केवळ कागदावर राबवण्याहेतू आज एका शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर सदरचे अभियान पार पाडल्याचे दिसून येते. दुसरीकडे या अभियानासाठी जी निमंत्रण पत्रिका काढण्यात आली होती त्या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रमाचे स्थळ हे मल्टीपर्पज ग्राऊंड असे टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मैदानाला छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण असे नाव आहे. सदरच्या पत्रिकेत विनीत म्हणून असलेले आरटीओ स्वप्नील माने आणि निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना छत्रपती संभाजी राजेंचे नाव देण्यास अडचण काय होती? महाराजांच्या नावाचा द्वेष का? असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात असून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान केवळ कागदापुरते आणि फाईलपुरते बीडच्या आरटीओ कार्यालयाला राबवायचे आहे हे यातून स्पष्ट होते. अशा कामचुकार आणि सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करणार्या व्यवस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून हाते आहे.