बीड (रिपोर्टर) आज सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान बिंदुसरा नदीवरील सर्वात जुन्या असलेल्या दगडी पुलाजवळील बिंदुसरा नदी पात्रात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, नगरपालिका सीओ अंधारे हे स्वच्छता कर्मचार्यांसह नदी पात्रात उतरून दगडी पुलापासून ते बाबासाहेबांच्या पुतळ्या पर्यंतचे नदीपात्र स्वच्छ केले.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी शर्मा आणि नगरपालिका सीओ यांनी बीड शहरासह बिंदुसरा नदी पात्र स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आठ दिवसांपुर्वी त्यांनी बार्शीनाका पुलाजवळही नदीपात्राची स्वच्छता केली होती. आज सकाळीही जुन्या पेठ बीड भागातील कंकालेश्वर मंदिर रस्त्याकडे जाणार्या शहरातील सर्वात जुन्या असलेल्या दगडी पुलाजवळच्या पात्रात जिल्हाधिकारी शर्मा स्वत: उतरले. पाठोपाठ नगरपालिकेचे कर्मचारी यांनीही या स्वच्छते मोहीममध्ये सहभाग नोंदवून दगडी पुलापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतचे नदीपात्र स्वच्छ केले. ही मोहीम सकाळी सहापासून चालू होती. बीड शहरातील बिंदुसरा नदी पात्रासह शहरातील इतर स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.