औरंगाबाद (रिपोर्टर) मी भाजपाची सच्ची कार्यकर्ता असून पक्षाचे आदेश आणि प्रोटोकॉल पाळते. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असते. पक्षाबाहेरील कार्यक्रमाला जाणे अपेक्षीत नसते. परंतु आज प्रदेशाध्यक्ष आले आहेत, मीही आले. त्यादिवशी नड्डाजी आले होते, तेव्हाही मी आले होते. मी भाजपामध्येच राहणार असल्याचे सांगून शिवसेनेच्या ऑफर संदर्भात प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला सांगितले आहे, मी त्यावर बोलणार नाही, असे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्या औरंगाबाद विमानतळावर पत्रकारांशी बोलत होत्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये दोन वेळेस आल्यानंतरही त्यांच्या कार्यक्रमाला पंका मुंडे आणि खा. प्रितम मुंडे यांनी गैरहजेरी दाखवली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून फडणवीस-मुंडे यांच्यात अंतर्गत खदखद असल्याचे बोलले जाते. आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत गेवराईमध्ये शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीबाबत प्रचार सभा झाली. त्यासाठी पंकजा मुंडे या आल्या होत्या. याबाबत औरंगाबाद विमानतळावरच पत्रकारांनी बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांना गाठले. पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात आमचा उमेदवार या वेळेस निश्चितपणे निवडून येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे या पुर्ण वेळ राहतील, असे बावनकुळे यांनी पत्रकारांना म्हटल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना मी भाजपाची सच्ची कार्यकर्ता आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला जाते, पक्षादेश आणि प्रोटोकॉल पाळते. आज प्रदेशाध्यक्ष आले आहेत, मी त्यांच्या सोबत आहे. याआधी नड्डाजी आले होते, त्या कार्यक्रमालाही मी उपस्थित होते. पक्षाबाहेरील कार्यक्रमाला उपस्थित राहणे मला अपेक्षीत नाही. मी भाजपातच राहणार आहे. शिवसेनेच्या ऑफर संदर्भात प्रदेशाध्यक्षांनी तुम्हाला सांगितलं आहे, मी त्यावर बोलणार नसल्याचे सांगून पंकजा मुंडे यांनी परराज्यातून मुलं आमिषे देऊन ऊसतोडणीसाठी आणली जातात, हे भयंकर आहे. सगळी माहिती घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. ऊसतोड कामगार कल्याण मंडळ अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगून याबाबतही आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे म्हटले.