गणेश सावंत
मो. नं. 9422742810
जेथे माणसाला माणूस म्हणून जगवण्यापेक्षा त्याला देव-धर्माच्या नावाने भीतीयुक्त केले जाते. माणूस धर्मापासून त्याला दूर लोटत अंधश्रध्देच्या खाईत नेले जाते. तेथे संत एकनाथांपासून जगद्गुरू तुकारामांपर्यंतचे संत-महात्मे या माणसांना पुन्हा माणसात आणण्यासाठी आपले उभे आयुष्य चंदनासारखे झिजवतात. ज्या संत महात्म्यांचे देह महान कर्तृत्वातून ईहीलोकी गेले अन् इथल्या मातीत श्रध्दा-सबुरी, ईश्वर भक्ती, मनुष्यप्रेम, मानवता पेरून गेले त्याच भक्तीच्या पेर्याला आजकालच्या तथाकथीत धर्म सुधारकांकडून जेव्हा नख लागले जाते तो पेरा पुन्हा पुन्हा खुडण्याचा प्रयत्न केला जातो. दिव्य दरबाराच्या नावाखाली अंधभक्तीचा दरबार मांडला जातो तेव्हा मात्र अशा पुर्णक्षेयी दरबारातल्या मस्तकातले किडे मारण्याहेतू पुरोगामी महाराष्ट्रालाच पुढे यावे लागते. कोण-कुठला धिरेंद्र महाराज महाराष्ट्राच्या नागपुरात येतो तिथे गंडादोरीपासून भुताखेतांना पळवून लावण्यापर्यंतचे दाखले दिले जातात. उपस्थित जनसमुदायांमधून निवडलेल्या लोकांच्या व्यथा आधीच महाराज आपल्या पर्चीतून दाखवून देतात. तुझ्या घरात काय आहे, खोलीत काय आहे, ते सांगतात. तेव्हा भाबडे भक्त टाळ्यांच्या कडकडाटात दिव्य दरबारात धिरेंद्र महाराजांचा जयजयकार करतात. जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून संबंधित महाराजाला आव्हान दिले जाते तेव्हा मात्र धिरेंद्र महाराज महाराष्ट्र सोडून पळून जातो. या सर्व घटनाक्रमाचा मतितार्थ आणि दिवट्या महाराजांच्या कर्तव्य कर्माचा अर्थ नेमका लावायचा काय? महाराष्ट्रात अंधश्रध्दा विरोधात प्रबळ कायदा आहे, त्यापेक्षा अंधश्रध्देवर प्रहार करणारे जगद्गुरू संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत तुकडोजी, गाडगे महाराज यांनी याआधीच उद्बोधन केले आहे. परंतु जेव्हा जेव्हा
धर्माची गोधडी
पांघरली जाते अन् भाबड्या भक्तांना धर्मवेडे करण्याहेतू प्रयत्न केला जातो तेव्हा महाराष्ट्र गपगुमान बसत नाही. हां यामध्ये भाबड्या भक्तांना अधिक भीतीयुक्त करण्याहेतू सरकारही सामील होते तेव्हा सत्य-असत्याशी मन केले ग्वाही म्हणत तुमच्या-आमच्या सारख्याला समोर यावे लागते. माणसाचं देवपण खर्या भक्तीत असते. मात्र ती खरी भक्तीच अशा धिरेंद्र महाराजांना करू द्यायची नसते. जिथे माणसाचा आत्मविश्वास संपतो, तेथेच अंधश्रध्देचा आरंभ होतो. विवेक, तारतम्य, कार्यकारण भाव, आत्मविश्वासाचा अभाव माणसाला अंधश्रविश्वासाकडे घेऊन जातो तेव्हा धूप, अंगारा, लिंबू, मंतरलेल्या पाण्याला खळखळाट येतो. तोच खळखळाट पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या मातीत वाहन्याचा प्रयत्न करतो तेव्हा या खळखळाटाला संताच्या वचनातून बांध टाकावाच वाटतो. ‘सांगो जातीन शकून भूत-भविष्य, वर्तमान त्याचा आम्हासी कंटाळा, पाहू नावडती डोळा, रिद्दी-सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होती एक, तुका म्हणे जाती पुण्यक्षेय अधोगती’ जगद्गुरू संत तुकाराम महाराज या अभंगातून जो कोणी भूत-भविष्य शकुण-अपशकुणची भाषा करतो त्या लोकांचं मला तोंडही पाहू वाटत नाही, अशांचा मला कंटाळा येतो. जे लोक स्वत:ला रिद्दीसिद्धी पावल्याचे म्हणतात, असे लोक पुण्यक्षेयाने अधोगतीकडे जात असतात. धिरेंद्र महाराजांचा
दिव्यदरबाराच पुण्यक्षेयी
आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. बावीस-पंचेवीस वर्षाचं पोरगं आपल्या मधूर वाणीतून धार्मिक ग्रंथांचं कथन करतं, भक्तांना-श्रोत्यांना श्रवण करताना ते अधिक बरं वाटतं. ईश्वराच्या नाम:स्मरणात तल्लीन होणं जसं इतरांना आवडतं, तसं आम्हालाही आवडतं, परंतु ईश्वराच्या नाम:स्मरणात तल्लीन झालेल्या भक्तांच्या भक्तीचा जेव्हा दुरुपयोग केला जातो, गंडेदोर्यापासून भूत बाधेपर्यंत त्यांना भरडले जाते आणि स्वत:ला साक्षातकारी ईश्वर अवतार जेव्हा जो कोणी मानतो तेव्हा मात्र अशा पुण्यक्षेयी दिव्य दरबाराची व्याख्या आणि त्यातले सत्य संत एकनाथांच्या भाषेत मांडावे वाटतात. काय नपुंसका पद्मीनीचे सोहळे, वांझेशी डोहळे कैसे होती, अंधापुढे दीप खराशी चंदनं, सर्पाशी दुग्धपान करू नये, क्रो अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्थ अपुली वाचा शिनवू नये, खळाची संगती उपयोगाशी नये, आपणा अपाय त्याचे संगे’ वैष्णवी कुठत्य टाकुनी वाळुनी, एका जनर्दनी त्याची भले, त्या दिव्य दरबाराचा एकनाथांच्या अभंगातून एक प्रकारे समाचारच म्हणावा लागेल. ज्या प्रमाणे वांझेला डोहाळे लागू शकत नाहीत, नपुंसक सुंदर तरुणीच्या यौवनाचे स्वप्न पाहू शकत नाही, आंधळ्याला दिव्याचा उपयोग नाही, सापाला दूध पाजू नये, रागीट आणि अविश्वासी माणसावर जसा उपदेश व्यर्थ जातो, तशाच प्रकारे अशा दरबारात जे काही अंधश्रध्देचे पेरे केले जातात आणि भक्तीच्या पेर्यांना खुडले जाते, ते माणूस धर्मविरोधीच म्हणावे लागेल.
अंधश्रध्दा
निर्मूलन समितीचे शाम माधव यांनी जेव्हा धिरेंद्र महाराजांना आव्हान दिले तेव्हा धिरेंद्र महाराज महाराष्ट्र सोडून गेले, परंतु त्यावरून धर्म बाटलाचा किंवा धर्म बुडाल्याचा टाहो काहींनी सुरू केला तो संतापजनक अविवेकी म्हणावा लागेल. जे दावे धिरेंद्र महाराजांनी केले, त्याचे प्रात्यक्षिक अंधश्रध्दा निर्मूलन समितीसमोर का केले जात नाही? जर ते इतर भक्तांचे सुख-दु:ख आधीच स्वत:च्या पर्चीमध्ये लिहू शकतात तर मग अंधश्रध्दा नर्मूलन समितीच्या पदाधिकार्यांचे सुख-दुखं का लिहू शकत नाहीत? यापेक्षाही पुढे जात एका पिठाच्या शंकराचार्यांनी थेट धिरेंद्र महाराजांना आव्हान देत उत्तराखंडातील जोशी मठाचे भूस्खलन रोखून दाखवण्याचे म्हटले आहे. त्यांनी जर जोशी मठाचे भूस्खलन रोखून दाखवले तर आम्ही त्यांचा जय जयकार करू, नाहीतर धिरेंद्र महाराज हे कपटी आहेत, हे पुन्हा पुन्हा बोलू. शंकराचार्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करू. तो तोच संत असतो जो भक्तांना-भाविकांना सत्याच्या मार्गाने घेऊन जात असतो. मात्र इथे धिरेंद्र महाराज ज्या भाषेत बोलतात, ती भाषा धमकीची असते. जातीयता आणि जातीयवाद निर्माण करू पाहणारी असते. या अंधश्रध्देमध्ये आता हा महाराष्ट्र जखडला जाणार नाही हे त्रिवाार सत्यच.
नवसे सायसे होती पुत्र
तर का करणे लागे पती हा तुकाराम महाराजांचा अभंक सर्वश्रूत आहे. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, वृक्ष ना धरी पुष्पफळं काय करील, वसंत काळ, वांझे ना होती लेकरे, काय करील भ्रतारे, नपुंसक नव्याशी काय करील बाईल त्यासी, या अभंकातूनही तुकोबांनी वस्तूस्थितीचे भान ठेवण्याचा सल्ला दिला आहे. परंतु धिरेंद्र महाराजांसारखे अंधश्रध्दा पसरवणारे जेव्हा हजारोंच्या जनसमुदायामध्ये भाष्य करतात, चिठ्ठ्या-चपाट्याच्या माध्यमातून आपण कसे ईश्वर अवतारी आहोत, हे दाखवून देतात तेव्हा त्यांना आव्हान देणे उचीतच. परंतु हे आव्हान देत असताना आणि त्यातला सत्य बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात असताना इथले तथाकथीत राजकारणी जेव्हा धर्माचे हत्यार बाहेर काढतात, राजकीय स्वरुप देऊ पाहतात तेव्हा मात्र अशा राजकारण्यांची किव करावीशी वाटते. जो व्यक्ती पोरी पळवून नेण्याची भाषा करतो, तो व्यक्ती धिरेंद्र महाराजांच्या मदतीला धावत
शाम माधवांचं आव्हान,
काँग्रेसची स्क्रिप्ट
म्हणून थेट अंधश्रध्दा निर्मून समितीच्या शाम माधवांच्या भूमिकेला राजकीय भूमिका ठरवू पाहतात तेव्हा भाजपाच्या राम कदमांची नक्कीच किव येते. असे हे जे काही महाराज अंधश्रद्धा पसरवू पाहत आहेत, त्या महाराजांच्या पाठीशी राजकीय शक्ती आहेच हे राम कदमांच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा स्पष्ट होते. ज्या नागपुरामध्ये टोकाच्या दोन विचारसरणी एकत्र नांदतात…एकीकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि विचार हातात घेऊन लोक ‘सर्वास पोटास लावणे आहे’ च्या भूमिकेत काम करताना दिसून येतात तर काही धिरेंद्र महाराजांसारख्या चिठ्ठ्या-चपाट्यावाल्या अंधश्रद्धाळू भक्तीचे विचार अंत:करणात पेरत अंधभक्तीत जगतात. राज्याचे उपुख्यमंत्रीही हात जोडून धिरेंद्र महाराजांच्या दरबारात उभे राहत असतील तेव्हा सुसंस्कृत संत एकनाथ ते संत तुकारामांपर्यंतच्या कर्तृत्व -कर्माचा हा र्हास नव्हे का? जर भारतीय जनता पार्टीतील लोकांना, नेत्यांना धिरेंद्र महाराजांच्या जादू, कला, चिठ्ठ्या चपाठ्या, गंडादोरा, भूतबाळा पळवा या जर सत्य वाटत असतील तर
तुकोबांची लढाई
ही खोटी होती का? संत एकनाथांचे प्रबोधन चुकीचे आहे का? संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी चुकीची आहे का? गाथेतले न भंगणारे अभंग चुकीचे आहेत का? तुकोबांनी जे काही अभंगातून अंधश्रद्धेवर प्रहार केले, देव-देवळात नाही तर तो माणसात आहे हे स्पष्टपणे सांगितले. भक्तीतील सार आणि अंधश्रद्धेवरील वार आपल्या कीर्तनातून-अभंगातून लोकांना पटवून दिले. भोंदूबाबा, गंडेदोर्यांपासून भगवे वस्त्र परिधान करणार्या भोंदुंपर्यंत तुकोबांनी जे लिखान केले, कवित्व केले ते चुकीचे होते काय? असे एक ना अनेक प्रश्न इथे उपस्थित होणारच. देव-देश आणि धर्म हा खर्या ईश्वर भक्तीने माणसा-माणसात जागृत राहतो आणि ती खरी ईश्वरभक्ती ही माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीच्या कर्मात असते. कर्मठ धर्मांधता आणि अंधश्रद्धेच्या विषात केवळ पुण्यक्षेयी दिव्य दरबाराच भरतात.