मुंबई (रिपोर्टर) आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांवरून राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. काहींच्या मते महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रित होऊ शकते. यातच आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास कोणाच्या बाजूने जनमत असेल, याबाबतचे सर्व्हे आले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना, राज्यात, देशात सत्ताधारी बहुमताचा आकडा गाठू शकणार नाहीत, असा दावा केला आहे.
कोल्हापूर दौर्यावर असलेल्या शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशी चर्चा आहे. त्यावर आपले काय मत आहे? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर, लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील असे काही लोकांचे मत आहे. पण त्याची विश्वासार्ह माहिती माझ्याकडे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच काही सर्व्हेंच्या जनमत चाचणीवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
बहुमताचा आकडा सत्ताधार्यांच्यासोबत राहणार नाही, असे चित्र या सर्व्हेतून दिसत आहे. तो सर्वे मी वाचला. आता जे सत्ताधारी आहेत, त्यांच्याविरोधात देशात जनमत आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता राहील असे वाटत नाही. यापूर्वीचे सर्व्हे पाहिले. पाच ते दहा वर्षापूर्वीचे याच एजन्सीने केलेले सर्व्हेही पाहिले तर या एजन्सीचे आकडे खरे ठरले आहेत. या एजन्सीने एकप्रकारे ही दिशा दाखवली आहे. ही दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीचे आहे असे वाटत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच या सर्व्हेतून देशात काँग्रेसचे आकडे वाढतील असे स्पष्ट दिसत आहे. कर्नाटकात भाजपचे राज्य राहणार नाही. तिथे परिवर्तन करण्यास लोक उत्सुक आहेत. असे चित्र सर्वत्र दिसत आहे. पण उत्तर प्रदेश हे मोठे राज्य आहे. त्याची आकडेवारी आलेली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, विरोधकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सर्वच पक्षांसोबत वाटाघाटी सुरू आहेत. परंतु स्थानिक पातळीवरील काही अडचणी आहेत. केरळमध्ये आम्ही डाव्यांसोबत आहोत. पण काँग्रेस आमचा विरोधक आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही काँग्रेससोबत आहोत. असे काही प्रश्न आहेत. त्यातून मार्ग काढायचा आहे. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यावेळी आम्ही चर्चा करून मार्ग काढू, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.