अग्रलेख- ‘अजित’ शाब्दीक अन् प्राथमिक
बोगसगिरी सत्याची कथा
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
सत्याची व्याख्या सांगताना कुठल्याही व्यक्तीला गर्व वाटतो. अभिमानाने उर भरून आलेला असतो. त्याच्या छातीचा कोटही झालेला असतो. मात्र सत्य स्वीकारताना आणि सत्याची अंमलबजावणी करताना त्याच व्यक्तीच्या छातीचा कोट कुठेतरी गायब झालेला असतो. 52 इंचाची छाती इंचभर होऊन गेलेली असते, आधी सांगितलेले चांगले विचार अडगळीला पडलेले असतात, सत्याच्या महिमेचा डांगोरा अन् पिपाणीही गलित गात्र झालेली असते. असेच काहीसे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याबाबत झाल्याचे पहावयास मिळते. जलजीवन मिशनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची ओरड सर्वत्र झाली. यामध्ये काँट्रॅक्टर, गुत्तेदार अन् व्हाईट कॉलरच्या समांगनातून असत्याचे पुत्र जन्मालाही आले, मात्र त्या जलजीवन मिशनमध्ये आज पावेत कुठल्याही व्यक्तीवर अथवा अधिकारी-कर्मचार्यांवर दोषारोप ठेवून गुन्हे दाखल झाले नाहीत. खरं पाहिलं तर जलजीवन मिशन प्रकरण आणि त्यातलं गांभीर्य हे अधिक ज्वलंत असायला हवं होतं, परंतु त्याला जाज्वल्य होऊ न देता प्रकरणाची धग कशी कमी होईल, आरडाओरडीचे राखेत कसे रुपांतर होईल आणि त्या राखेतली धग थंड कशी पडेल, याकडे अधिक अधिक प्रमाणात लक्ष दिलं गेल्याचे उघड दिसून येत आहे. जलजीवन मिशन प्रकरणाबरोबर बोगस अपंगांचे प्रमाणपत्र देणारे शिक्षकांचे प्रकरण समोर आले, यामध्ये बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारे बदल्या करून घेणारे 52 शिक्षक निलंबीत केले गेले खरे परंतु पुढे काय? जे जलजीवन बाबत पहावयाला मिळाले तेच शिक्षकांच्या प्रकरणामध्ये होणार आहे काय? शिक्षकांचे निलंबन, उर्वरित शिक्षकांबाबतची कारवाई, बोगस प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांचा शोध कोण घेतय का, कोणी घेणार आहे का, हे प्रश्न निखळ स्वच्छ चारित्र्य असल्याचा आभास निर्माण करणार्या प्रशासनातील अधिकार्यांना विचारावाच लागणार आहे.
‘अजित’
या शब्दाचा अर्थ जसा दोन डगरींवर हात ठेवणारा आहे आणि दोन्ही डगरीवरून आपलं अस्तित्व निर्माण करणारा आहे, तसा अजित नावाच्या माणसाचे अंत:करण हे दोन डगरींवरचे आहे का? अजित हे नाव संस्कृतमधून घेण्यात आले आहे. तिथे त्याचा प्राथमिक अर्थ ‘अंजिक्य’, ‘अप्रतिम’, ‘अतुलनिय’ यासह सकारात्मक उंचीवर नेणारे हे नाव शाब्दीक अर्थामध्ये अविजयी येते. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी बीडची जिल्हा परिषद जेव्हापासून आपल्या नेतृत्वात सांभाळण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी ज्या पद्धतीने काम केले किंवा ग्रामीण भागात सिंचनासह अन्य कामावर आपले लक्ष असल्याचे दाखवून वृक्षारोपणासारखे मोठमोठे कार्यक्रम घेतले. विविध सरपंचांच्या संपर्कात राहून गावच्या विकासावर भाष्य केले, तेव्हा अजित या नावातली सकारात्मक उंची आम्हाला उर भरवणारी वाटली, अभिभानाने छातीचा कोटही झाला. परंतु जेव्हा जलजीवन मिशनचे काम बीडमध्ये आले आणि त्यामध्ये व्हाईट कॉलरच्या माध्यमातून जलजीवनच्या निधीचे लचके तोडले जाऊ लागले, तेव्हा मात्र अजिंक्यची उंची अविजयात मोजावी लागते काय? हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. काही प्रकरणांमध्ये विभागीय आयुक्तांनी थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवारांचे त्याकडे असलेले दुर्लक्ष भ्रष्टाचार्यांना पाठिशी घालणारे नव्हे काय? दस्तुरखुद्द सुनील केंद्रेकरांनी या प्रकरणात भ्रमणध्वनीवरून वेळोवेळी सुचीत केल्यानंतरही साधा अहवालही विभागीय आयुक्तालयात जात नसेल तर तो कर्तव्यदक्ष अजित पवारांचा सकारात्मक दृष्टीकोन म्हणावा का? ज्या जलजीवनच्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचारी दोषी आढळले त्यामध्ये थेट व्हाईट कॉलर गुलाबरावांपासून अन्य सत्ताधार्यांचे फोन अजित पवारांना येतात म्हणे. मग अजित पवारांचा सत्य, न्याय, अभिमान, स्वाभिमान यावरचं आत्तापर्यंतचं प्रवचन खोटं होतं काय? आम्हाला वाटतं, अजित पवारांनी याबाबत आत्मचिंतीत होत आपल्या ‘अजित’ शब्दाचा शाब्दीक आणि प्राथमिक अर्थापैकी कुठला अर्थनीय शब्द आपल्या अजित नावाला जोडावा. ज्या शब्दात शाब्दीक आणि प्रार्थमिकता दिसून आलेली असते तेव्हा त्या व्यक्तीच्या
कर्तव्य-कर्माची
बोगसगिरी
पहावयाला मिळते. मग भलेही तो उच्चपदस्थ अधिकारी असतो किंवा सर्वसामान्य माणूस असो. संत असो वा उच्छाद् मांडणारा व्यक्ती असो. निर्बूद्ध असो वा बुद्धीवंत असो त्याची विचार करण्याची कुवत मोठी असली तरी कर्तृत्व आणि कर्मातली बोगसगिरी जेव्हा उघड होते तेव्हा तो व्यक्ती समाजासमोर तर नागवा होतोच अंतर्मनातूनही नागवा झालेला असतो. याचं ज्वलंत उदाहरण बीडमधल्या बोगसगिरी करणार्या शिक्षकांतून दिसून आलं. ‘गुरु ब्रह्मा गुरू विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरू साक्षात परब्रह्म’ असं म्हणत गुरुंची ओवाळणी केली जाते, गुरूला माथ्यावर नव्हे तर शिखरावर पोहचविले जाते, त्यांच्या पायाशी तुमचे-आमचे इमान असते. मात्र हाच गुरू जेव्हा बदमुर्ख होत असत्याची कास धरतो, तेव्हा अशा गुरुला समाजामध्ये ‘पिंजरात’ला गुरुजी म्हणून ओळख निर्माण होते. बाईच्या नादी लागला म्हणून जर पिंजरा असेल तर असत्याच्या मागे लागून काम करणारा गुरूजी त्यापेक्षाही नालायक म्हणावा लागेल. केवळ बदली आपल्या इच्छेनुसार व्हावी, शहराच्या जवळ व्हावी म्हणून स्वत: अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र काढणे शिक्षक या जातीला अपमानित करणारेच. या प्रकरणात 52 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली, अन्य शिक्षकांवरही निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगितले जाते, मात्र खरी मेख मारण्याची ताकद नेतृत्व करणार्या आणि सत्य हेच आपले ब्रिद मानणार्या उच्चपदस्थ अजित यांच्यात आहे का? जे खरे अपंग असलेले लाखो बेरोजगार बाहेर नोकरीच्या शोधात असताना बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवणार्या शिक्षकांची कॉलर पकडण्याची हिम्मत अद्याप प्रशासन आणि शासनात काम निर्माण झाली नाही? हे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अद्याप मोकाटपणे बाहेर का आहेत?गुन्हा करणार्यापेक्षा त्याला प्रोत्साहन देणारा अधिक जबाबदार असतो. म्हणूनच आजचे प्रश्न आम्ही अजित पवारांना विचारतोत. अजित पवारांकडे सकारात्मक दृष्टीकोनाचा अधिकारी म्हणून पाहत आलोत, या माणसाला बीडचे चित्र बदलावयाचे आहे, त्याला काम करायचे आहे, म्हणून आम्ही त्यांच्या प्रत्येक अॅक्टीव्हिटीवर लक्ष ठेवून राहिलो, परंतु इथे जलजीवन मिशन आणि अपंग शिक्षकाच्या बोगस प्रमाणपत्र प्रकरणात कारवाईला जो वेग हवा तो वेग आम्हाला पहावयाला मिळालेला नाही. त्यामुळे अजित पवारांनी
आपल्या नावाचा
प्राथमिक अर्थ
शोधण्याचा खटाटोप करताना त्या नावाचा सन्मान होईल, असे काम केले तर अधिक बरे होईल. असतील मंत्री, कोणी गुलाब असतील, अन्य कुणी व्हाईट कॉलरमध्ये फोन करत असतील, परंतु सत्य याची जपवणूक करू पाहणार्या अजित पवारांनी जलजीवन मिशनच्या कामामध्ये भ्रष्टाचार करू पाहणारे आणि भ्रष्टाचार केलेल्या लोकांवर कारवाई करायलाच हवी. अजित पवारांमध्ये ती धमक नसेल, असे आम्हाला वाटत नाही, परंतु चारित्र्य आतापर्यंत चांगले ठेवले त्यावर टक्केवारीचे शिंतोडे कशाला हवेत? एवढच आम्हाला त्यांना विचारावसं वाटतं अन् सांगावसं वाटतो. टक्केवारीतला प्रश्न उमजून घेण्यापेक्षा जिल्हा परिषदेमध्ये जे दोन गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे ते शिक्षकांचे आणि जलजीवनचे दोन्ही सर्वसामान्यांच्या भविष्याशी निगडीत आहेत. एकतर पिढी घडवणारा शिक्षक असा बोगसगिरी करत असेल तर त्याला आतमध्ये टाकणे हेच त्यावरचं सर्वात मोठं कल्याणकारी उत्तर राहील आणि पाण्यासारख्या महत्वाच्या कामात कोणीजर भ्रष्टाचाराची घाण टाकत असेल, तर अशांना सोलून काढणे हे कर्तव्य-कर्मातले सर्वश्रेष्ठ धोरण मानावे लागेल, त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अजित पवारांनीच ठरवायचे आहे, त्यांना कर्तव्य-कर्मातले सत्य शोधत अजित या नावातल्या शाब्दीक अर्थासोबत जायचे आहे की, प्राथमिक अर्थाबत.