ग्रामसेवक, नर्स, अंगणवाडीताई सह वर्ग-3 व 4 च्या कर्मचार्यांची धाकधुक वाढली
बीड (रिपोर्टर)ः-जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारावर बदल्यासह नौकरी घेणारे शिक्षकांचा भांडा फोड झाल्यानंतर आता बीडचे जिल्हा परिषद विभाग अन्य विभागातील अपंग कर्मचार्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात येत असून येत्या आठवडा भरात वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांसह अंगणवाडी,नर्स, ग्रामसेवक यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. त्यामुळे बोगसगिरी करणार्या कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये अनेक शिक्षकांनी बोगस अपंगाचे प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ आजपर्यंत उठवला होता. या प्रमाणपत्राची चौकशी केल्यानंतर त्या 78 शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघडकीस आले होते याची दखल जि.प.च्या सिईओंनी घेवून सदरील 78 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यात धर्तीवर आता जि.प.च्या 11 विभागाच्या अपंगाच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्यात येणार आहे. तसे पत्र आज जिल्हा परिषद काढणार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेतील अनेक विभागामध्ये वर्ग-3 व 4 च्या कर्मचार्यांसह अंगणवाडीताई, नर्स, ग्रामसेवक यांनी अपंगाचे प्रमाणपत्र जोडलेले आहे. हे प्रमाणपत्र किती प्रमाणात खरे आहे. त्यात बनावटपणा तर नाही ना त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. शिक्षण विभागामध्ये 78 जण बोगस निघाले. या सर्व कर्मचार्यांवर जि.प.च्या सिईओंने निलंबनाची कारवाई केल्यामुळे शिक्षण विभागात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे. आता इतर विभागाकडे सिईओंनी लक्ष केंद्रीत केल्यामुळे सर्वच विभागातील बोगस अपंग प्रमाणपत्र काढणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.