अभिवादन रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा
बीड (रिपोर्टर) गेल्या अनेक वर्षांपासून महापुरुषांना जाती आणि धर्मामध्ये वाटण्याचे काम करण्यात येत आहे. हे थांबवून महापुरुषांनी सर्व जाती आणि धर्मांसाठी समान वागणूक देत चांगले काम केले आहे. त्याचाच आदर्श समाजात निर्माण व्हावा म्हणून येणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी सर्वधर्मिय व सर्व जातींच्या लोकांनी मिळून शहरातून भव्यदिव्य अशी अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये समाजातील सर्वच लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वधर्मिय छत्रपती शिवाजी महाराज जयंती समितीच्या वतीने करण्यात आले.
गेल्या पाच वर्षांपासून बीड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी सर्वच जाती समुहातील व्यक्ती आणि धर्मियांच्या वतीने अभिवादन रॅली काढण्यात येते. मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे या रॅलीला खंड पडला होता. मात्र यावर्षी ही रॅली मोठ्या उत्साहात आणि बहुसंख्येने काढण्यात येणार आहे, असे सर्वधर्मिय शिवजयंती समितीचे पदाधिकारी सी.ए. बी.बी. जाधव, शेख शफीक, बबन वडमारे, राजू जोगदंड, बळीराम गवते, डॉ. पिंगळे, राऊत, अशोक सुखवसे यांनी संयुक्तरित्या आयोजीत पत्रकार परिषदेत सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करताना मुस्लिम समुदाय, न्हावी समुदाय व इतर सर्व समाजातील लोकांकडे न्याय व्यवस्थेसह संरक्षण दलाची जिम्मेदारी होती. सगळ्या जातीतील आणि धर्मातील लोकांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज म्हणले की मराठा समाज, महात्मा फुले म्हणले की, माळी समाज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणले की बौद्ध समाज अशामुळे समाजाती वातावरण बिघाड होत आहे. त्यामुळे सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे यासाठी ही सामाजिक सर्वधर्मिय अभिवादन रॅली काढण्यात येत आहे. या अभिवादन रॅलीमध्ये अनेक शाळेतील विद्यार्थी सहभागी होत असून विशेषत: उर्दू शाळेतील 200 मुलींचे लेझीम पथक सहभागी होत आहे तर अनेक मुस्लिम मुली शिवाजी महाराजांच्या राज्य काळातील न्याय व्यवस्थेतील इतर राज्य कारभारातील अनेक पात्रांवर आपली वेशभुषा सादर करणार आहेत. ही अभिवादन रॅली जिल्हा स्टेडियम येथून निघून माळीवेस, धोंडीपुरा मार्गे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येणार आहे. या रॅलीमध्ये पालखीमध्ये शिवाजी महाराज यांची प्रतिमा ठेवून त्या प्रतिमेला प्रशासकीय अधिकार्यांसह समाजातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.