आठ परीक्षा केंद्र संवेदनशील
शिक्षण विभागाचे पाच भरारी पथके
38 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू होत असून या परीक्षेसाठी जिल्ह्यात 101 परीक्षा केंद्र आहेत. एकूण 38 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले असून या सर्व परीक्षा केंद्रांवर महसूल विभागाचे 101 बैठे पथक तैनात करण्यात येणार आहे. 101 परीक्षा केंद्रांपैकी केवळ 8 परीक्षा केंद्रे हे संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून शिक्षण विभागाने नोंद केली असून या परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाची विशेष नजर राहणार आहे.
येत्या मंगळवारपासून बारावी बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. या बोर्ड परीक्षेला बीड जिल्ह्यातून मुले आणि मुली मिळून जवळपास 38 हजार परीक्षार्थी बसलेले आहेत. शिक्षण विभागाने 101 परीक्षा केंद्रांपैकी 8 परीक्षा केंद्रे हे संवेदनशील परीक्षा केंद्रांची नोंद केलेली आहे. या वेळेस कधी नव्हे ते महसूल विभागाने इयत्ता बारावीच्या परीक्षा केंद्रांसाठी परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर अर्धा तास ते पेपर संपेपर्यंत महसूल विभागाने त्यांच्याच विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्यांचे 101 बैठे पथक या परीक्षा केंद्रांवर
तैनात करणार आहेत. त्यामुळे बाहेरील लोकांना परीक्षार्थ्यांना चिटींगसाठी कॉपी पुरविता येणार नाही याची खबरदारी महसूल विभागाने घेतल आहे तर शिक्षण विभागानेही या 101 परीक्षा केंद्रांवर सतत नजर ठेवण्यासाठी पाच फिरते भरारी पथक नियुक्त केले आहेत. यामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), योजना अधिकारी (शिक्षण विभाग) आणि प्राचार्य डाएट यांचे पथकप्रमुख नियुक्त केले आहे. महसूल विभागाच्या बैठे पथकामुळे यावर्षी बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडणार आहेत.