बीड (रिपोर्टर) राज्यासह बीड जिल्ह्यामध्ये आजपासून दहावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली असून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात 156 परीक्षा केंद्रांवर 41 हजार 521 विद्यार्थी परीक्षा देत असून या परीक्षांवर शिक्षण विभागाच्या पाच भरारी पथकांची नजर असून महसूल विभागाचेही बैठे पथक तैनात करण्यात आलेले आहे.
21 फेब्रुवारीपासून बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर आज राज्यासह बीड जिल्ह्यात दहावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून जवळपास 41 हजार 521 विद्यार्थी बसलेले असून 156 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे. बीड जिल्ह्यात ही विद्यार्थी संख्या 652 शाळेतील असून प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, अंबाजोगाई येथील शिक्षक आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्यासह पाच शिक्षण विभागाचे भरारी पथके या परीक्षेवर नियंत्रण ठेेवून आहेत. शिक्षण विभागाच्या पथकासह महसूल विभागाचे बैठे पथकेही या परीक्षेला ठाण मांडून आसून आज मराठीचा पेपर सुरू आहे. आजपासून 25 मार्चपर्यंत या परीक्षा चालणार आहेत.