300 ते 500 उंबर्यांच्या बक्करवाडीसारख्या छोट्याशा खेड्यागावात ऊसतोड कामगार असलेल्या गाडे कुटूंबियांना तीन मुली. या तिघींचेही बाळांतपण सिजरने झालेले. अनैसर्गिक पध्दतीने बाळांतपण झाल्यामुळे महिलेची प्रकृती आधीच खालावत असलेली. अशा स्थितीतही वंशाला दिवा हवा ही इच्छाशक्ती गाडे कुटूंबियांच्या तनामनात भरलेली. ही इच्छाशक्ती नुसत्या गाडे कुटूंबियातच नव्हे तर ती कुठल्याही कुटूंबात असते यावर दुमत असण्याचे कारण नाही. कारण पुरूष प्रधान संस्कृतीला फॉलो करणारे तुम्ही आम्ही, मुलींच्या कतृत्वाला मान्यताप्राप्त करूनच देत नाही. अशावेळी वंशाचा दिवा हा फक्त मुलगाच असु शकतो ही मानसिकता 21 व्या शतकातही अबाधीत राहणे यात आश्चर्य वाटण्यासारखं नसल्याने गाडे कुटूंबियांनी मुलगा हवा ही अभिलाषा ठेवली. चौथ्यांदा गरोदर राहिल्यानंतर गाडे कुटूंबातील शितल गाडे हिला हे बाळांतपण झेपणार नाही असे जेव्हा वाटू लागले, तेव्हा बरेच दिवस उलटून गेले. या कालावधीत पोटातला गर्भ वाढला. तेव्हा शेवटची संधी म्हणून हे लिंगनिदान करण्यासाठी अवैध पध्दतीने नक्कीच गेले. लिंगनिदानात ते अर्भक स्त्रि जातीचे असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा गाडे कुटूंबियांनी गर्भपाताचा निर्णय घेतला. ज्याठिकाणी लिंगनिदान झाले त्या ठिकाणी गर्भपातासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मागण्यात आले. तेवढे पैसे गाडे कुटूंबियाकडे नव्हते. म्हणून हे कुटूंब 3 जून रोजी बीडच्या जिल्हा रूग्णालयात डेरेदाखल झाले. तिथे त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. 4 जूनला गर्भपात करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले. मात्र पून्हा जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तुम्ही लिंगनिदान करून आला आहात, मुलीचा गर्भ आहे म्हणून तुम्हाला गर्भपात करायचा आहे, हे कायद्याने चुकीचे आहे असे सांगत गर्भपात करण्यास नकार दिला. जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी घेतलेला निर्णय हा कायदेशीर होता. परंतू जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी गाडे कुटूंबियांची मानसिकता ओळखत त्या रूग्णाकडे लक्ष ठेवले असते तर ते अधिक बरे झाले असते. यापुढे गाडे कुटूंब घरी गेले, अवैध पध्दतीने खाजगी नर्स एखादा डॉक्टर, कंपांउंडर यांच्या सहाय्याने अक्षरश: गोठ्यामध्ये शितलचा गर्भपात करण्याचा मुर्खपणा केला. यात शितलची गर्भपिशवी फाटली, प्रचंड रक्तस्त्राव झाला, ते रोखणे कठीण झाले, म्हणून नातेवाईकांनी उपचारासाठी तिला बीडच्या एका रूग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी ती मृत अवस्थेत आढळली तेव्हा डॉक्टरांनी जिल्हा रूग्णालयात रेफर केले आणि इथून स्त्रीभृण हत्या आणि
बीडमधले लिंगनिदानचे
भिंग फुटले
जिल्ह्यातील आणि शहरातील डॉक्टरांचे खायचे दात आणि दाखवायचे दात याबाबत संशय कल्लोळ निर्माण होत गेला. कारण यापूर्वी किमान दहा ते अकरा वर्षाआधी बीडच्या परळीत असाच मुलींचा कर्दनकाळ महाराष्ट्राने नव्हे तर जगाने पाहिला होता. सुदाम मुंडे नावाचा डॉक्टर ज्याने अनगणित गर्भातील मुलींची हत्या केली होती, ते गर्भ नदी, नाले आणि ओढ्यात टाकले जात होते. कुत्र्यांचे भक्ष म्हणून ते गर्भ त्यांच्यासमोर फेकले जात होते. अशी भयाव आणि सत्य परिस्थिती बीड जिल्ह्यात गेल्या दशकात अनुभवली जात असताना त्या प्रकरणात सुदाम मुंडे सारख्या डॉक्टरला आणि त्याच्या डॉक्टर पत्नीला दहा दहा वर्षाची शिक्षा झाली असताना पून्हा बीडमध्ये लिंगनिदान करण्याचे आणि गर्भपात करण्याचे धाडस जेव्हा होते तेव्हा ‘हमाम मे सब नंगे’ आहेत म्हणूनच. एकतर जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने अवैध लिंगनिदान करणार्या सोनोग्राफी सेंटरकडे लक्ष ठेवायला हवे मात्र ते ठेवले जात नाही. म्हणून दिवसा ढवळ्या
लिंगनिदानची कमाई
केली जाते. मुलाच्या हव्यासापोटी लिंगनिदान करण्यास आलेल्या व्यक्तींकडून किमान 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिक पैसे घेतले जातात. रोज कमीत कमी पाच जास्तीत जास्त आठ ते दहा लिंगनिदान केले जाते. याचा अर्थ अडीच लाख रूपये रोजापेक्षा अधिक पैसे या लिंगनिदानाच्या धंद्यात आहेत. याचे रगत मुस्कटाला लागलेल्या निर्लज्ज डॉक्टर मग त्या महिला असोत अथवा पुरूष असोत. यांनी हे तोंडचे रगत पुसने मुश्कील झाले अन बीड जिल्ह्यात सर्रासपणे लिंगनिदानाचे धंदे सुरू ठेवण्यात आले. लिंगनिदान करण्यासाठी आलेली व्यक्ती ही गरजू असते, ती गोपनिय माहिती ठेवते, पैसे देते, त्यामुळे लिंगनिदान कुठे केले? कोणाकडे केले? याची माहिती बाहेर येत नाही. त्यामुळे लिंगनिदानाचे पाप करणारे या धंद्यातले बाप होतात. प्रशासनालाही याची माहिती असते. काही लाचखोर हप्तेखोर वरिष्ट अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळेही या धंद्यांना तेजी येते. बीड जिल्ह्यात
लिंगनिदानाचा धंदा कुठे?
हा जर प्रश्न विचारला तर आमच्यासारख्या माध्यमांच्या प्रतिनिधींना लिंगनिदान कुठे होते ? याची माहिती पुरेपुर असते. मग ती माहिती जिल्हा प्रशासनाकडे का नसावी? शितल गाडे मृत्यू प्रकरणात शितलचे गर्भाचे लिंगनिदान कुठे झाले? याची माहिती अद्याप पोलिसांकडे का नसावी? हे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा आम्ही तर उघडपणे शितलच्या प्रकरणात लिंगनिदान हे गेवराईतच झाले हे ठामपणे सांगतो. तरीही त्या दिशेने तपास होत नाही किंवा होत असेल. आम्ही एवढेही सांगू, बीडमध्येही हा प्रकार होतो. उस्मानाबादमधून काही डॉक्टर लिंगनिदानाची घरपोच सेवा देतात. लिंगनिदान करण्यासाठी एका गाडीत व्यवस्था केल्याचेही सांगण्यात येते. या गोष्टी माध्यमांपर्यंत येत असतील तर मग त्या तपास यंत्रणेपर्यंत का जात नाही? याचाच अर्थ इथे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते किंवा अर्थांजनामुळे दुर्लक्ष केले जाते? याचा साधकबाधक नव्हे तर थेटपणे विचार व्हायलाच हवा. ज्या बीड जिल्ह्यामध्ये स्त्रीभृण हत्या प्रकरण हे सातत्याने बीडच्या कतृत्व कर्माला काजळी लावून जाते, त्याप्रकरणात आता जिल्हा वासियांनी अशा मारेकर्यांचा शोध घेण्याहेतू समोर यायला हवा. ज्याप्रमाणे लिंगनिदान करणारी टोळी आहे, त्याप्रमाणे
गर्भपात आणि कटप्रॅक्टीसचे
अड्डेही बीड शहरासह जिल्हाभरातील काही दवाखान्यात थाटले आहेत. अड्डे हा शब्दप्रयोग दारू,मटका, जुगार यासह शरिर विकणार्या परंतू स्वाभिमानी असणार्या वेश्या व्यवसायाबाबत केला जातो. मात्र आज ज्याच्याकडे देव म्हणून पाहिले जाते त्या देवातील राक्षसी वृत्ती जेव्हा इथे पैदा होतात. तेव्हा त्यांच्या दवाखान्यांना अड्डा हा शब्दप्रयोग यथोचित वाटतो. लिंगनिदान कुठे करायचे? कोणाकडे करायचे? हे सांगणारे डॉक्टर आणि त्याबदल्यात कटप्रॅक्टीसद्वारे पाच दहा हजार कमावणारे डॉक्टर इथेच आहेत. गर्भपात कुठे करायचा? कमी पैशामध्ये कोण करेल? आपला, परका, जातीचा, परजातीचा हे समिकरण मांडणारे आणि तुम भी खाओ, हमे भी खाओ या भूमिकेत असलेले डॉक्टर इथेच आहेत. यांचा शोध घेणेही तेवढेच महत्वाचे आहेत. गर्भलिंग निदान करणे आणि गर्भातच मुलींची हत्या करणे हे महापाप आहे. परंतू हे करण्यासाठी अर्थांजनातून गोरगरिबांना सर्रासपणे लूटले जाते. हा ही सर्वात मोठा गुन्हा आहे. खरे तर सामाजिक बांधिलकी जपणार्या
लोकांनी पुढे यावे.
लिंगनिदान कुठे केले जाते? गर्भपात कुठे होतो? लिंगनिदान कुणी केले? लिंगनिदान करणार्यांनी गर्भपात कुठल्या दवाखान्यात केला? याची गोपनियता नक्कीच असते. मात्र आठवडाभरात त्या घरातील व्यक्तींनी आपल्या मित्र परिवाराला हा प्रकार इथे इथे होतो हे सांगितलेले असते. गर्भात होणारी मुलींची हत्या रोखायची असेल तर समाजातील जागरूक नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपले कर्तव्य म्हणून आता अशा हत्यार्यांना शोधण्याची गरज आहे. ज्या लोकांना गर्भपात कुठे होते हे माहित आहे, त्यांच्याकडे काही पुरावे आहेत तर अशा लालची डॉक्टरांचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांनी पुढे येवून कोण गर्भपात करतो? कोण लिंगनिदान करते? यांचे नावे थेट तपास यंत्रणांना द्यावे. आणि तपास यंत्रणांवर विश्वास नसेल तर सोशल मिडीयाच्या माध्यमातून अशा डॉक्टरांचा बुरखा टराटर फाडावा. असे आमचे स्पष्ट मत आहे. लिंगनिदान होत असताना सर्रासपणे गर्भपाताचा घटना घडत असताना
जिल्हा प्रशासन काय करतंय?
हा सवाल नक्कीच विचारला जाईल. आणि तो आम्हीही विचारू. बीडचे आरोग्य विभाग या प्रकरणाकडे दुर्लक्ष का करतंय? ज्या क्षेत्रामध्ये हे गोरखधंदे होतात त्या क्षेत्रातली इत्यन्भूत माहिती जिल्हा प्रशासनातल्या आरोपी विभागाला असते. मग तक्रारीची वाट बघण्यापेक्षा एखाद्या महिलेचा मृत्यू होण्यापेक्षा गर्भपात करणार्या डॉक्टरांवर कारवाई केली. लिंगनिदान करणार्यांच्या मुसक्या बांधल्या तर हे प्रकार होणार नाहीत. आता तरी शितल गाडेच्या मृत्यूने जिल्हा प्रशासनाला जाग यायला हवी. स्त्रीभृण हत्या हे सर्वात मोठे पाप आहे. आणि या पापाचे भागिदार व्हायचे नसेल तर हा गोरखधंदा बंद करण्याचा मनसुबा इमाने इतबारे जिल्हा प्रशासनाने राबवावा. हे जेवढे खरे तेवढाच पाप करणारांना
आत्मक्लेषही
होणे गैर नाही. या प्रकरणात गर्भपात करणारी सिस्टर तिचा मृतदेह गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात बीडच्या बिंदुसरा पात्रात मिळाला. हा आत्मक्लेष होवून आत्महत्या म्हणा अथवा गुन्ह्याची भिती म्हणा.. परंतू या प्रकरणातले बडे मासे सापडतील म्हणून त्या सिस्टरचा घातपात झालेला असेल तर हे गंभीरच. त्यामुळे त्या सिस्टरचा मृतदेह त्याठिकाणी कसा मिळाला? तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला? याचा शोध होणे नितांत गरजेचे आहे. एका अशिक्षीत महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान मृत्यू होतो, त्या प्रकरणाने पून्हा गर्भातच मुलींची हत्या करणारे रॅकेट आजही अस्तित्वात आहे हे स्पष्ट होते. त्यातून जर अवैध गर्भपात करणार्या सिस्टरचा घातपात झालेला असेल तर गर्भात मुलींची हत्या करणारे रॅकेट काय करू शकते? याचा अंदाज येतो. गर्भपात करणारे डॉक्टर गुंड पाळतात का? गुन्हेगारी वृत्तीचे तर ते आहेतच, परंतू मनी आणि मसल पॉवर वापरण्यासाठी ते राजकीय हस्तक आहेत का? हे शोधण्यासाठी इमानदार तपासी अधिकारी महत्वाचा आहे.