बीड (रिपोर्टर) राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी संपामध्ये असल्याने पीक पंचनाम्यासाठी थोडी अडचण आहे. त्यामुळे कर्मचार्यांची उपलब्धता नसेल तर पंचनामे करण्यासाठी बीएसस्सी अॅग्री व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करुन घेता येईल का ? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमच्या लोकांनी, शासकीय कर्मचार्यांनी संप परत घेतला नाही तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल अशी स्पष्ट भूमिका राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडली.
बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर शनिवारी सकाळी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने मिलेट दौडच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. पुढे मंत्री सत्तार म्हणाले की, राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने काही ठिकाणी पीक पंचनाम्यांची अंमलबजावणी सुरु आहे तर काही ठिकाणी कर्मचारी नसल्याने अडचण आहे.
पंचनाम्यासाठी यंत्रणा नसेल किंवा तुमच्याकडे कर्मचारी येत नसतील तर अशा संकटाच्या काळामध्ये बीएसस्सी ग्री व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करुन घेता येईल का ? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमच्या लोकांनी संप परत घेतला नाही तर आम्हाला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. नुकसानीची दक्षता घेण्याचा आदेश कर्मचार्यांना देण्यात आलेला आहे. तसेच कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, त्यावर विचार सुरु असून निर्णय घेणार आहे. मात्र आस्मानी संकटाच्या वेळी आपल्या शेतकरी बांधवांना वेठीस धरु नये असे आवाहन कृषी मंत्र्यांनी केले. पीक पंचनामे झाले नाही तर त्याची शेतकरी मी जाहीर केलेल्या चार क्रमांकावर कॉल करु शकतील. त्या संदर्भाने एक प्रेस नोट तयार केली आहे. तसेच एक सहाजणांची टीम स्थापन केली असून त्यातील सदस्य शेतकर्यांना पीक पंचनाम्यासाठी मदत करतील असेही कृषी मंत्री सत्तार म्हणाले.
तृणधान्य उत्पादनाकडे लक्ष देणार
आरोग्यासाठी आणि आयुर्मान वाढवण्यासाठी आपल्या आहारात तृणधान्याची नितांत गरज आहे. गावपातळीवर शेतकर्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सरपंचांनी शाळेच्या प्रांगणात किवा मोकळ्या जागेत तृणधान्य विक्रीला जागा उपलब्ध करून द्यावी, सोबत या शेतकर्यांनी पिकवलेले धान्य बचत गटाच्या माध्यमातून कसे विकता येतील, याकडे सरपंचांनी लक्ष द्यावे. सरकारच्या माध्यमातून राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र तृणधान्याखाली आणण्यात येणार असून अंगणवाडी आणि शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार म्हणून तृण धान्याचा वापर कसा करता येईल याबाबतही शालेय व्यवस्थापन आणि ग्रामस्थांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा नियोजन विभागात झालेल्या सरपंच कार्यशाळेत सांगितले.