आरोपींविरोधात पोस्कोनुसार गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर) जवळच्याच नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल घडली तर चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याची घटना काल घडली. दोन्ही आरोपींविरोधात पोस्को कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकाकडे राक्षसवाडी येथे आली असता गावातीलच परमेश्वर गडदे या 26 वर्षीय नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना काल घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात पिडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 376, 376 (2) (एफ) भा.दं.वि.सह कलम 4,8,12 पोस्कोनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिनगाडे या करत आहेत. दुसरी घटना चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड मातोरी येथील नराधम सचीन रघुनाथ घाटे हा करत होता. या प्रकरणी चकलांबा पोलिसात कलम 354 (अ), (1) (5) डी, 323, 504, 506, 507, 509 भा.दं.वि.सह पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साबळे हे करत आहेत.