प्रत्येक ग्रामपंचायतीला केले डेमोचे वितरण
बीड (रिपोर्टर) शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केले जाते. काही नागरिक वेगवेगळ्या पद्धतीचे घरे बांधले जातात. मात्र आता शासनाने ठरवून दिलेल्या डेमोनुसारच घरकुल बांधण्याचे आदेश सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले असून डेमोचे वाटप पंचायत समितीमार्फत ग्रा.पं.ना करण्यात आले.
देशभरातील प्रत्येक नागरीकांना हक्काचा निवारा मिळावा हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. दरवर्षी जिल्हा पातळीवर हजारो घरकुलांना मंजुरी दिली जाते. घर बांधताना कसे बांधावे, याबाबतचे निकष ठरवून दिलेले असताना काही लाभार्थी मात्र आपआपल्या सोयीनुसार घराचे बांधकाम करत असतात. मात्र शासनाने घर बांधण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. तसा डेमो बनवण्यात आलेला आहे. त्यानुसारच घराचे बांधकाम करण्यात येणार आहे. तशा सूचना प्रत्येक पंचायत समितींना देण्यात आले. पं.स.ने आपआपल्या हद्दीतील सर्व ग्रामपंचायतींना घराचा डेमो दिलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये पंतप्रधान आवास आणि रमाई आवास योजनेअंतर्गत घराचे बांधकाम सध्या सुरू आहेत. ज्या ज्या ग्रामपंचायतींना टार्गेट दिलेले आहे त्या टार्गेटनुसार घराचे बांधकाम करण्यात येत आहे.
घरावर लागणार अशा पद्धतीची पाटी
घरकुल योजनेमधून घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घरावर पाटी लावण्याचे निर्देश सुद्धा पंचायत समिती विभागाने ग्रा.पं.ना दिलेले आहेत. त्या पाटीवर लाभार्थ्याचे नाव, गाव, तालुका, जिल्हा यासह इतर बाबींचा उल्लेख असणार आहे.
269 चौरस फुटांमध्ये बांधकाम असावं
घरकुल बांधत असताना संबंधित पंचायत समितीच्या इंजिनिअरने आराखडा काढून दिलेला असतो. त्यानुसर बांधकाम करायचे असते. घरकुल 269 स्क्वेअर फुटामध्ये बांधणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी बांधकाम केले तर त्याचे हप्ते निघणार नाही, असे पं.स.च्या वतीने बजावण्यात आले आहे. याच्यापेक्षा मोठे बांधकाम असेल तर चालते, असे बीड पं.स.चे गटविकास अधिकारी सानप यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.