पाच वर्षापासून एकाच टेबलवर ठाण मांडून
वरिष्ठ अधिकार्यांच्या बोगससह्या करून त्रुटी काढली जाते
फाईलमध्ये त्रुटी नसली तरी पैसे न दिल्यामुळे त्रुटी काढणार्या मोराळेला बडतर्फ करा
त्रस्त शिक्षकांची सीईओंकडे मागणी
बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी शिक्षण विभागातील कामचुकार कर्मचार्यांवर निलंबनाच्या कारवाया केल्या तरी वैद्यकीय विभागाचा टेबल सांभाळणार्या मोराळेंचा भ्रष्टाचार मात्र सीईओंना दिसत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या टेबलवर ठाण मांंडून बसलेले मोराळे हे दहा टक्के रक्कम दिली तरच वैद्यकीय बिलांची मंजूर करतात. जे 10 टक्के देत नाहीत त्यांना वर्षभर हेलपाटे मारावे लागतात. शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्रुट्या नाही काढल्या तरी त्यांच्या हस्ताक्षरासारखे हस्तक्षर करून फाईलमध्ये त्रुटी काढतात. अशा मोराळेंना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी अनेक शिक्षकांतून केली जात आहे.
गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोराळे हे वैद्यकीय परिपुर्ततेचे टेबल सांभाळतात. स्वत:सह शिक्षण विभागातील इतर अधिकार्यांचेही उखळपांढरे करत असल्यामुळे या अधिकार्यांना मोराळे हे हवे हवेसे वाटतात. त्यामुळे ना त्यांचा टेबल बदलतो ना त्यांची बदली होते, जे शिक्षक आपल्या वैद्यकीय बिलासाठी 10 टक्के रक्कम तात्काळ देतात अशांचेच वैद्यकीय बिलाची फाईल परिपूर्ण करून शिक्षणाधिकारी अणि या बिलासंदर्भातील समितीची तात्काळ मंजुरी आणतात. जे दहा टक्के देत नाहीत त्यांना मात्र वर्षभर मोराळे कोणते ना कोणते कारण सांगत हेलपाटे मारायला लावतात. तीन लाखांच्या पुढील बिलासाठी पैसे दिले तर त्याचेही ते तुकडे पाडतात. जे पैसे देत नाहीत आणि हुजुरेगिरी करत नाहीत अशा शिक्षकांच्या तीन लाखांच्या पुढील बिल डायरेक्ट शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण आयुक्त यांना पाठविले जाते. जे शिक्षक पैसे देत नाहीत अशा शिक्षकांच्या फाईल परिपूर्ण असल्या तरी आणि शिक्षणाधिकारी आणि वैद्यकीय बिलाची परिपुर्तता समिती यांना फाईलमध्ये त्रुटी काढली नसली तरी अधिकार्यांच्या बोगस हस्ताक्षर करून फाईलवर त्रुटी असल्याचे लिहिले जाते आणि प्रचंड प्रमाणात पैसे देणार्या शिक्षकांना मोराळे हे त्रास देतात. अशा मोराळेंना तात्काळ निलंबनाची कारवाईच नाही तर त्यांना सेवेतूनच बडतर्फ करावे, अशी मागणी संतप्त शिक्षकांतून होत आहे.