मुंबई (रिपोर्टर) राजकारणात वेगवेगळ्या प्रकारची टिका-टिप्पणी होतेच. ती होऊ नये असं वाटतं, परंतु ती होतच राहणार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेल्या टीकेने तेदेखील व्यथित होणार नाहीत, असा विश्वास भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फडणवीसांवरील टीकेबद्दल प्रश्न विचारल्यानंतर पंकजा यांनी अशा प्रकारच्या टीकेबद्दलचा त्यांचा अनुभव मांडला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मीसुद्धा राजकारणात अनेक टीकांना सामोरी गेले आहे. माझा डिस्टिलरी प्लान्ट असल्यामुळे काही नेत्यांनी माझ्यावर दारुवाली बाई अशी टिप्पणी केली होती. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा अत्यंत खालच्या पातळीवर टीका झाली, माझं ट्रोलिंग झालं. रेल्वेस्टेशनवर माझे फोटो लावण्यात आले. माझे फोटो लावून पाकिटं वाटली, मला नावं ठेवली, अपमान झाला.
पंकजा म्हणाल्या की, राजकारण हा काटेरी रस्ता आहे, इथे काटेरी सिंहासन आहे, काटेरी मुकूट आहे. इथे केवळ फुलंच वाट्याला येणार नाहीत, तर टीकाही वाटयाला येईल. अनेकदा खालच्या पातळीवरची टीका वाट्याला येईल. मला विश्वास आहे की, देवेंद्र फडणवीस या टीकेमुळे व्यथित होणार नाहीत. ते त्यांचं काम व्यवस्थित करतील. या सर्व गोष्टी राजकारणाचा एक भाग आहेत. कोणीही असं करू नये असं वाटतं, परंतु ते होत राहणार आहे.