गणेश सावंत
मो. नं. 9422742810
नऊ महिने गर्भवासी राहत आईच्या उदरातून जन्म घेतला. जिच्या उदरातून तुमचा-आमचा जन्म झाला ती स्त्रीच. परंतु त्याच स्त्रीच्या उदरातून जन्म घेतलेले काही गिधाडे आज मुलींचे गर्भातच लचके तोडतात. त्या गिधाडांची टोळी आज बीड जिल्ह्याच्या नाक्या नाक्यावर दिसून येत असली तरी आमचा कायदा आंधळा आहे आणि ‘पोलीस के हात केवळ चित्रपटातच लंबे’ जसे दिसून येतात तसे तपास यंत्रणेचे हात गर्भलिंग निदान प्रकरणात शेपूट घातल्यागत बांधून ठेवलेले पहावयास मिळतात. गेल्या दशकभरापूर्वी बीडची नाचक्की अवघ्या जगात झाली. सुदाम मुंडेंसारखा गर्भाचे लचके तोडणारा गिधाड प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत जन्मला, इथं त्याच्या पापाचे शंभर घडे भरले अन् प्रभू वैदद्यनाथानेच जणू त्याच्या मुसक्या बांधत त्याच्या पापाची शिक्षा त्याला दिली. परंतु इथं गिधाड संपले नाही तर ते पुन्हा पुन्हा जन्माला येऊ लागले आणि स्त्री जातीचा गर्भ चाखण्यासाठी दवाखाने थाटून बसले. गेल्या आठ दिवसांपुर्वी मुलीचा गर्भ काढताना आईच्या उदराला जो त्रास झाला असेल आणि त्या त्रासात त्या माऊलीचा जो जीव गेला असे त्या जिवाचा आकांत काय असेल देव जाणे. मात्र या प्रकरणात
गर्भाचे लचके तोडणारे
महाभाग मिळून यायला हवेत, यासाठी अवघ्या जगाची मानसिकता असली तरी या प्रकरणातील तपासी यंत्रणा मात्र गर्भाचे लचके नेमके कोण तोडतो? यातला प्रमुख एकही गिधाड सापडवण्यात अपयशी ठरली आहे. दुर्दैव याचं वाटतं ज्या महिलेने मुलाची अभिलाषा ठेवली आणि तीन मुलींच्या पाठीवर गर्भपात करताना स्वत:चे बलिदान दिले ते चांगले की वाईट याचा हिशोब त्या बिचारीच्या ईहलोकी होईच परंतु तिच्या पश्चात भारतीय दंड विधानानुसार गर्भातच मुलीची हत्या करू पाहणारे आणि तिला मदत करणारे तिच्या घरचे भाऊ, नवरा यांना मात्र अटक होऊन गुन्हा दाखल झाला. ते त्यांच्या पापाचे म्हणण्यापेक्षा अज्ञानाचे मारेकरी ठरले. त्या लोकांना अटक करणे, त्यांच्याकडून माहिती घेणे, लिंगनिदान कोणी केले, गर्भपात करण्यासाठी कुठे कुठे गेले याची माहिती घेत या प्रकरणात खर्या मुळावर घाव घालणे अपेक्षीत होते मात्र आज आठ ते दहा दिवसानंतरही तो अपेक्षा भंग होताना दिसून येत आहे. बाहेर दवाखान्यामध्ये गर्भपात करण्यासाठी ज्यादा पैसे द्यावे लागतील या बालबुद्धीतून त्या महिलेच्या नातेवाईकांनी खासगी दाईकडून गर्भपात करण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयातून पुढे जे काही घडले ते
गरोदर बाई ते दाईला नडले
ज्या खासगी दाईने (नर्सने) या प्रकरणात मदत केली, गर्भपात करण्यासाठी प्रयत्न केले त्या दाईवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिचा मृतदेह बिंदुसरा धरणाच्या पात्रात मिळून आला. यातले गांभीर्य अद्यापही यंत्रणेला दिसून येत नाही का? त्या बाईने आत्महत्या भीतीपोटी केली की, गर्भाचं रगत लागलेल्या गिधाडांनी तिचा लचका तोडला? मध्यरात्रीच्या दरम्यान गुन्हा दाखल होतो आणि दुसर्या दिवशी महिलेचा मृतदेह धरणपात्रात मिळतो. माणसं येतात आणि जातात तसे मरतातही. मग त्यांचा पंचनामा करणे आणि अंत्यविधी करणे एवढेच कर्तव्य समाजाचे आहे का? शासन प्रशासन व्यवस्थेचे आहे का? या प्रकररातील तपासी यंत्रणेचे आहे का? की इथली तपासी यंत्रणा खाबूगिरीमध्ये धन्यता मानते? किंवा यांच्यात तपास करण्याचे धाडस नाही? की तपासी यंत्रणेला असं काही मिळालं, की ती यंत्रणा या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करत राहिली. ज्या सानप नावाच्या महिलेकडून लिंग निदानाबरोबर गर्भपात करणार्या
गिधाडांचा पर्दाफाश
होऊ शकणार होता त्या महिलेची पोलीस कोठडी मागून अधिक तपास करण्यापेक्षा पोलीस यंत्रणेने त्या महिलेची न्यायालयीन कोठडी का मागितली? तिला ताब्यात घेतलं म्हणजे शीतल गाडे गर्भपात आणि मृत्यू प्रकरणातले सर्व धागेदोरे मिळाले का? तिचा एमसीआर मागणे म्हणजेच या पुर्ण प्रकरणावर पांघरुण घालण्यासारखे नाही का? असे एक ना अनेक प्रश्न शीतल गाडे गर्भपात, लिंगनिदान, मृत्यू प्रकरणात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. प्रकरण अत्यंत गंभीर असताना केवळ मयत महिलेच्या नातेवाईकांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनाच बळीचं बकरं करणं हे कितपत योग्य आहे? बीडमध्ये जर लिंगनिदान होत असेल, गर्भपात करणार्या डॉक्टरांच्या टोळ्या दुकाना थाटून बसल्या असतील तर त्या ग्रामीण भागातील अज्ञानी लोकांचा दोष काय? सामाजिक मानसिकता जशी पुरुषप्रधान संस्कृतीची आणि वंशाच्या दिव्याची आहे त्या समाजातच ते गाडे कुटुंबिय राहतं ना, त्यामुळे गाडे कुटुंब तर पोलिसांच्या ताब्यात आहे, आता महत्वाचा प्रश्न आहे तो बीड जिल्ह्यात कोण, कुठं आणि कसं लिंगनिदान करतय. बीड जिल्ह्यात कुठले डॉक्टर गर्भातच मुलींची हत्या करण्यास मदत करतात याचा शोध व्हायलाच हवा.
लिंगनिदानची थिएरी
ही गर्भात बाळाची वाढ कशी होते? हे पाहण्यासाठी सोनोग्राफी करतात, तेथूनच प्रत्येक महिन्याला गर्भवासी आपल्या पोटातल्या गर्भाला पाहण्यासाठी उत्सुक असते अन् इथच वंशाला दिवा हवा हा अट्टाहास ठेवणार्या घरंदाज म्हणण्यापेक्षा लालची कुटुंब दोन-तीन महिन्याच्या गर्भात संबंधित सोनोग्राफी सेंटर चालकांना किंवा तिथल्या डॉक्टरला मुलगा आहे की मुलगी? हे विचारत असतात. ते जर सांगत नसतील तर ते आपल्या पेशाशी इमान राखतात मात्र काही डॉक्टर असे असतात की त्यांना केवळ आणि केवळ लिंग पाहण्यात आपल्या पोटपाण्याचा मार्ग दिसतो आणि ते उघडपणे लिंगनिदानाचा धंदा करतात. तोच धंदा बीडमध्ये अत्यंत तेजीत आहे. या धंद्याला सुदाम मुंडे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही काळ कुलुप लागले होते, मात्र जसे जसे ते प्रकरण विस्मृतीकडे गेले तसे तसे पुन्हा लिंगनिदान आणि गर्भातच मुलींची हत्या होणे सुरू झाले. आता शीतल गाडेचा मृत्यू आणि तिचा गर्भपात करणार्या डोंगरे नावाच्या दाईचा मृत्यू समाजाला आणि व्यवस्थेला ओरडून सांगत आहे. आमचं चुकलं परंतु त्या चुकीच्या मार्गावर नेणार्यांचं काय? म्हणूनच आमचे तपास
यंत्रणेला सवाल….
शीतल गाडेचा मृत्यू झाला, त्या महिलेने अवैध गर्भपात केला, हे सत्य बाहेर आले. भाऊ, नवरा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. अन्य तिघांवरही हा गुन्हा दाखल झाला परंतु गेल्या पाच-सहा दिवसांच्या कालखंडात तपास यंत्रणेने लिंगनिदान कुठे झाले? तो डॉक्टर शोधला का? ज्या मशीनने लिंगनिदान झाले ती मशीन अद्याप ताब्यात घेतली नाही? ज्या महिलेला पोलीस कोठडी मागायला हवी होती त्या महिलेला न्यायालयीन कोठडी का मागितल? गर्भातच मुलींची हत्या करणार्या डॉक्टरांना पाठिशी घालण्याचे काम यंत्रणा करतेय का? सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असताना पाच दिवसांच्या कालखंडात तपासामध्ये बेरीज का होत नाही? या प्रकरणातील संशयित आरोपींना सावरासावर करण्यासाठी संधी दिली जातेय का? यंत्रणेच्या वेळकाढू तपासामुळे जे तीन जीव गेले आहेत त्या जिवांना किंमतच नाही का? आम्ही यंत्रणेला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, बीड जिल्ह्यात लिंगनिदान हातेय. गर्भातच मुलींची हत्या करणारे डॉक्टरही इथेच आहेत. तपास यंत्रणेलाही हे सर्व माहित आहे. आता फक्त दोषींना ताब्यात घ्या, त्यांच्या मुसक्या बांधत गर्भाचे रगत लागलेल्या गिधाडांना हुसकावून लावा.