तारीख वाढवून देण्याची शिक्षक वर्गातून मागणी
बीड (रिपोर्टर) राज्यातील खर्या विद्यार्थ्यांची संख्या शिक्षण विभागाला कळावी आणि खरा शिक्षक वर्गही शिक्षण विभागाला कळावा या हेतुसाठी येत्या 30 एप्रिलपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शिक्षण विभागाच्या वेबाईटला लिंक करणे चालू आहे, मात्र ही वेबसाईट वारंवार हँग होत आहे. दिवसातून दोन ते तीनच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होत आहेत. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत संपुर्ण विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या तारखेत वाढ करून 31 मे 2023 पर्यंत करावी, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासोबतच निकाल तयार करण्याचे कामही शाळेत सुरू आहे. त्यातच शिक्षण विभागाकडून प्रत्येक दिवशी एक शासन आदेश काढून अनेक प्रकारची माहिती या शिक्षकांकडून मागितली जाते. त्यामध्ये शाळा सिद्धी सोबत विद्यार्थी आणि शिक्षकांचे आधार कार्ड शिक्षण विभागाच्या वेबसाईटला लिंक करावे, असे आदेश गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण आयुक्तालयाने काढले. आधार केंद्र हे खासगी व्यक्तीचे असते, या आधार केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत ग्रामीण भागाती अनेक नागरिकांचे कामे असतात. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना दिवसभर या सेतू केंद्रावर थांबून राहणे शक्य नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून ही आधार कार्ड अपडेट करण्याची वेबसाईट वारंवार हँग होत असून दिवसातून फक्त दोन ते तीन आधार कार्डच अपडेट होत आहेत. दोन -तीन आधार कार्ड अपडेट केले तरी व्यवसायाला परवडत नसल्यामुळे अनेक सेतू केंद्रांनी शाळेचे काम नाकारले आहे. ग्रामीण भागातील खासगी शाळांनी दिवसभराचा मेहनताना देऊन आधार कार्ड चालकाला शाळेतच घेऊन गेलेले अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाने 30 एप्रिल ही जी तारीख दिलेली आहे त्यामध्ये वाढ करून 31 मेपर्यंत करावी, अशी मागणी होत आहे.