आत्महत्या करण्यापूर्वी शेतकर्याने चिठ्ठी लिहून ठेवली
बीड (रिपोर्टर) महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. वांगी येथील एका तरुण शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून काल इमामपूर परिसरामध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या शेतकर्याने चिठ्ठी लिहून ठेवली. कोणाकडे किती पैसे आहेत आणि कोणाला किती पैसे द्यायचे याची माहिती चिठ्ठीमध्ये असल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे वांगी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोपीचंद बाबुराव शेळके (वय 38, रा. वांगी) हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांना शेती परवडत नसल्याने त्यांनी दूधडेअरीचा व्यवसाय सुरू केला होता. यामध्ये अनेक लोकांकडे त्यांचे पैसे होते. त्याचबरोबर त्यांच्याकडेही काही जणांचे पैसे होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी काल इमामपूर रोडवर आत्महत्या केली. या घटनेची माहिती काही नागरीकांना झाल्यानंतर त्याठिकाणी अनेकांनी धाव घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी शेळके यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये पैसेवाल्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन रात्री जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.