बारा ते पंधरा लाखांची रोकड लंपास; सोनेही पळविले
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची धाव
ठसे तज्ञांसह श्वानपथकाला पाचारण
नेकनूर (अमजद पठाण): इमारतीच्या पाठीमागील बाजूस शिडी लावून गॅसकटरने खिडकी तोडत बँकेत प्रवेश करून बँकेची तिजोरी फोडत नगदी रोख 12 ते 14 लाखांसह सोने घेऊन अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सदरचा दरोहा हा बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर टाकण्यात आला. या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांनाच होताच घटनास्थळी सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्यासह पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी भेट दिचली. घटनास्थळ पंचनामा करत घटनास्थळावर ठसे तज्ञांसह श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. दरोडेखोरांनी तिजोरीमधील पाचशे आणि दोनशेचे बंडल पळवून नेले. दहा आणि वीसचे बंडल तसेच तिजोरीत ठेवल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर दरोडेखोरांनी आतमधील सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर चोरून नेला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, बीड तालुक्यातील अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान असलेल्या लिंबागणेश येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रात्री धाडसी दरोडा पडला. मध्यरात्रीच्या दरम्यान दरोडेखोरांनी बँकेच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस लोखंडी शिडी लावली त्या शिडीवर चढून गॅस कटरने इमारतीच्या खिडकीचे लोखंडी गज तोडले आणि त्यांनी आत इमारतीमध्ये प्रवेश केला. आतमधील दरवाजे तोडत स्ट्राँग रुम गॅस कटरने फोडले. सर्वच साहित्य सोबत घेऊन दरोडेखोर गेल्यामुळे दरोड्याच्या या घटनेला अंजाम देण्यासाठी किमान त्यांनी एक ते दोन तास घटनास्थळावर घातले असावे. तिजोरी फोडून चोरट्यांनी आतमधील नगदी रोकडसह दागिने लंपास केले. नगदी रोख रक्कम 12 ते 15 लाखांच्या आसपास असण्याची माहिती बँक मॅनेजर प्रणव कापसे यांनी प्रथमदर्शनी पोलिसांना सांगितले मात्र सोने किती गेले हे अद्याप समजू शकले नाही. दरोडेखोरांनी दहाचे आणि वीसचे बंडल तसेच तिजोरीत सोडून दिले. या घटनेला अंजाम देण्यासाठी आणि आपला माग लागू नये यासाठी दरोडेखोरांनी बँकेमधील सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर आपल्या सोबत नेले. सदरची घटना ाज सकाळी उघडकीस आली तेव्हा नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा, उपनिरीक्षक विलास जाधव, अजय पानपाटील, पोलीस कर्मचारी शेख, नवनाथ मुंडे घटनास्थळावर दाखल झालेत र सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनीही सकाळी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली. सदरचा दरोहा हा मोठा आणि बँकेवर पडला असल्याने बीड पोलीस प्रशासन पुर्णत: हादरले असून घटनास्थळावर ठसे तज्ञासह श्वानपथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले होते. सदरच्या दरोड्याच्या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून सर्वसामान्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .