जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा
काँग्रेस, उद्धव बाळासाहेब शिवसेनेचाही सहभाग
बीड (रिपोर्टर) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार व खा. संजय राऊत यांना धमक्या देण्यात आल्या. याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. गळ्यात काळे गमजे घालून हा मोर्चा काढण्यात आला होता. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या मोर्चामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेसह काँग्रेसचे नेते यांचाही सहभाग होता.
‘तुमचा दाभोळकर करू’, असे म्हणत सोशल मिडियाद्वारे खा. शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. त्याचबरोबर सेनेचे खासदार संजय राऊत यांनाही धमकी दिली होती. नेत्यांना धमक्या देणे म्हणजे कायदा व सुव्यवस्था बासनात गुंडाळली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित करत धमकीच्या निषेधार्थ आणि दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा (पान 7 वर)
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघाला होता. कार्यकर्त्यांनी गळ्यात काळे गमजे घालून मोर्चात सहभाग नोंदवला होता. या वेळी आ. संदीप क्षीरसागर, आ. विक्रम काळे, आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ. सिराज देशमुख, माजी आ. सुनिल धांडे, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी अ. सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, प्रा. सुशिलाताई मोराळे, माजी आ. राजेंद्र जगताप, उषाताई दराडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख, अॅड. हेमाताई पिंपळे, कमलताई निंबाळकर, बाळा बांगर, कल्याण आखाडे, के.के.वडमारे यांच्यासह महाआघाडीचे नेते-कार्यकर्ते यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
तेव्हा समर्थकांना आवरणं
अवघड जाईल -संदीप क्षीरसागर
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यासह ठाकरे सेनेचे खा. संजय राऊत यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. ही घटना संतापजनक आहे. आज कार्यकर्त्याला आणि समर्थकाला आवरता आले, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई तात्काळ झाली नाही आणि पुन्हा असा प्रकार घडला तर कार्यकर्त्यांसह समर्थकांना आवरणे मुश्किल होईल. हे शासन-प्रशासन व्यवस्थेने लक्षात घ्यावे, असे आ. संदीप क्षीरसागर म्हणाले.
आज मूकमोर्चा उद्या ठोक मोर्चा काढू -अनिल जगताप
खा. पवार साहेब यांच्यासह खा. संजय राऊत यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. धमक्या काय देतात, आम्हाला समोरासमोर बोलवा, आम्ही तेथे येऊ, असे बोलत आज आम्ही याबाबत निषेध करण्यासाठी मूकमोर्चा काढलाय, वेळीच दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर ठोकमोर्चा काढू. असा इशारा ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी प्रशासनाला दिला.
…तर परिणामाला सामोरे जा -अमरसिंह पंडित
राष्ट्रादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार साहेब व ठाकरे सेनेचे खासदार संजय ररूत यांना ट्विटरद्वारे आणि फोनद्वारे थेट जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. ही गंभीर बाब आहे, धमक्या देणारे कोण आहेत? हे सर्वांना माहित आहे, त्या धमक्या देणार्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, कारवाई झाली नाही तर जे काही पडसाद आणि परिणाम उमटतील त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारसह प्रशासनाची असेल, असा इशारा माजी आ. अमरसिंह पंडित यांनी या वेळी दिला.