तहसील कार्यालय आणि ग्रा.पं.निवडणूक विभागात समन्वयाचा अभाव
बीड (रिपोर्टर) जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत निवडणूक विभागाला दिल्यानंतरही 49 गावातील 49 सदस्य अपात्र करण्यात आले होते. सदरची कारवाई ही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी गेल्या आठवड्यात केली होती. मात्र या प्रकरणातले सत्य समोर आल्यानंतर अखेर या 49 गावातील 49 सदस्यांवर करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याची माहिती येत आहे. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे 49 गावातील सदस्यांना मानसिक त्रास झाला. या प्रकरणात जबाबदार असणार्या दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. यामध्ये दिंद्रुड आणि कोळवाडी येथील दोन सरपंचाचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत सादर केले नाही म्हणून 2021 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील तब्बल 214 विजयी सदस्य अपात्र केले होते. या 214 सदस्यांमध्ये काही सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत दिलेले होते. तशा आशयाची माहिती त्याच दिवशी निवडणूक विभागाला देण्यात आली होती. निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभाराचा नुमना तेव्हा समोर आला होता. विशेष म्हणजे एका गावात मयत सदस्यांवरही अपात्रतेची कारवाई केली गेली होती. त्याठिकाणी पोटनिवडणूकही झालेली होती. आता मात्र निवडणूक विभागाला आपल्या गलती आणि गफलतीची उपरती आल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील 49 गावांमधील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी त्यावेळी निवडणूक विभागाकडून जात वैधता प्रमाणपत्र दिल्याची पोचपावतीही घेतलेली आहे. हे सर्व कागदपत्रे निवडणूक विभागाला सादर केचल्यानंतर निवडणूक विभागाच्या अधिकार्यांना आपला मुर्खपणा जाणवला आणि अखेर आता या 49 गावातील 49 ग्रा.पं. सदस्यांवर केलेली अपात्रतेची कारवाई मागे घेण्याची नामुष्की जिल्हाधिकार्यांवर आली.
दिंद्रुडच्या सरपंचाचे पद जाणार?
दिंद्रुड येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजय कोमटवार हे अनुसूचीत जमातीचे असून त्यांनी राखीव वार्डातून निवडणूक लढवण्याऐवजी ओपन वार्डातून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयीही झाले होते. येथील सरपंच पद हे अनुसूचीत जमातीसाठी राखीव असल्याने आणि कोमटवार हे ओपन वार्डातून निवडून आल्याने ते सरपंच पदासाठी अपात्र असल्याचा दावा निवडणूक विभाग करत असल्याने त्यांचे सरपंचपद जाणार मात्र ग्रा.पं.सदस्यत्व पात्र राहणार.