केज (रिपोर्टर): केज शहरातील हायवे रस्त्याच्या लगत 30 वर्षांपुर्वी काही व्यापार्यांना स्व. विलासराव देशमुख यांनी फलोत्पादन खात्याची जमीन दिली होती. मात्र या जागेवरील अतिक्रमण आज पोलीस बंदोबस्तामध्ये उठवण्यात आले. अतिक्रमण उठवण्यापुर्वी व्यापार्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यापार्यांनी केली होती मात्र व्यापार्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. तीनशे ते चारशे व्यापार्यांचे दुकाने हटवल्याने जवळपास 1 हजार कुटुंब रस्त्यावर आले आहेत. अतिक्रमण हटवत असताना कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
केज येथील हायवे रस्त्याच्या लगत फलोत्पादन खात्याची जमीन आहे. या जमीनीवर तीस वर्षांपुर्वी काही व्यापार्यांनी आपले व्यवसाय उभे केले होते. सदरील व्यवसायिकांना स्व. विलासराव देशमुख यांनी ही जमीन दिली होती. मात्र आता सदरील जमीनीवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. अतिक्रमण हटविले जात असल्याने आधीच काही व्यापार्यांनी आपल्या टपर्या आणि दुकाने हटविले होते. अतिक्रमण हटविण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने विचार करावा आणि व्यवसायिकांचे व्यवसाय मोडू नये, अशी मागणी केली होती तसेच इतर ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती मात्र व्यापार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज सकाळपासून सदरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. या वेळी कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे अतिक्रमण हटविण्यासाठी फलोत्पादन, महसूल, सार्वजनिक बांधकाम खाते, नगरपंचायतच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांची उपस्थिती होती. व्यापार्यांना हटविल्यामुळे एक हजार कुटुंबियांचे संसार उघड्यावर आले आहे.