तीस लाखापेक्षा अधिकची किंमत; तिघा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
माजलगाव (रिपोर्टर) गोरगरिबांच्या तोंडचा घास धान्यमाफिया सातत्याने महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पळवतात. आज सकाळी माजलगाव येथून लातूरकडे तांदूळ आणि गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमावतांच्या पथकांनी दोन ट्रकवर छापा मारून जप्त केले. सदरची कारवाई आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास परभणी टी पॉइंट येथे करण्यात आली. या कारवाईत 22 टन तांदूळ आणि 19 टन गहू जप्त करण्यात आला असून याची किंमत लाखोंच्या घरात आहे.
बीड जिल्ह्यात वाळूमाफियांसह धान्य माफियांची टोळी सक्रिय आहे. राशनचा माल सर्रासपणे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची ओरड सातत्याने होते. मात्र महसूल प्रशासन यांच्या लाचखोरी धोरणामुळे धान्य माफियांचे फावते माजलगाव येथून आज सकाळी एम.एच.12 ए.क्यु.6795 या ट्रकमधून गहू तर एम.एच.26 ए.डी.7717 या ट्रकमधून तांदूळ लातूरकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला झाली. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही ट्रक माजलगावच्या परभणी टी पॉइंटवर अडवण्यात आल्या. त्यावेळी ट्रकमध्ये 22 टन तांदूळ तर दुसर्या ट्रकमध्ये 19 टन गहू मिळून आला. धान्यासह ट्रक पोलिसांनी जप्त केले असून यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये प्रभाकर गायकवाड हा नांदेड जिल्ह्यातला चालक असून, युसूफ इसाक अत्तार, शेख अमजद यांना ताब्यात घेवून चौकशी सुरू आहे. कुमावतांच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोन्ही ट्रकसह 30-35 लाखापेक्षा जास्त जास्त रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने धान्यमाफियात खळबळ उडाली आहे.