शिरूर कासार (रिपोर्टर): शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बालविवाह होतात. ते बालविवाह होऊ नयेत यासाठी सरपंचांनी प्रयत्न करायला हवेत, यापुढे बालविवाह झाले तर आई-वडिलांसह फोटोग्राफर, पत्रिका छापणारा, पुजारी यासह अन्य जणांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा देत ऊसतोडणीपेक्षा रोजगार हमी जास्त पैसे देते, त्यामुळे रोजगार हमीच्या कामाकडे वळावे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही. ऊसतोड मजुरांनी नोंदणी करून घ्यावी, असे म्हणत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
‘आष्टी येथे योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी’ या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. या वेळी आ. सुरेश धस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सरपंच संघटनेचे दत्ता काकडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या की, राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य माणसांना योजनेचा लाभ कसा घेता येईल याकडे लक्ष दिले जात आहे. लोकांनी य योजनांचा लाभ घेतला पाहिजे, ऊसतोड मजुरांनी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळात नोंदणी केली पाहिजे, ऊसतोडणीला मोठ्या प्रमाणावर महिला जातात, खरे पाहिले तर ऊसतोडणीपेक्षा रोजगार हमी जास्त मजुरी देते, त्यामुळे इथेच राहून आपल्या मुलांचे शिक्षण करत कष्ट केले तर काही हरकत नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी म्हटले. बालविवाह कराल, तर फोटोग्राफर, पत्रिका छापणारा, पुजारी यांच्या सर्वांवर गुन्हा दाखल करू, शेतकर्यांनी आपल्या केवायसी जोडून गेतल्या पाहिजेत, असे सांगत जिल्हाधिकार्यांनी विविध योजनांची माहिती या वेळी दिली.