जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही -सरपंच पटेल
बीड (रिपोर्टर): जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था आहे. अनेक शाळांवर शिक्षक कमी असल्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. कामखेड्याच्या जि.प. उर्दू शाळेत गेल्या दोन वर्षांपासून दोनच शिक्षक असल्याने वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभाग शिक्षकांची नियुक्ती करत नसल्याने संतप्त गावकर्यांनी आज शाळेला कुलूप ठोकले. जोपर्यंत शिक्षक दिले जात नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडण्यात येणार नसल्याचा आक्रमक पवित्रा सरपंच बिलाल पटेल यांनी घेतला आहे.
बीडपासून काही अंतरावर असलेल्या कामखेडा गावात जिल्हा परिषदेची उर्दूची पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. या शाळेमध्ये 103 मुले आहेत. या मुलांना शिकवण्यासाठी फक्त दोनच शिक्षक आहेत. चार शिक्षकांच्या जागा दोन वर्षांपासून रिक्त आहेत, वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभाग शिक्षकांची नियुक्ती करत नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. काही पालकांनी आपल्या पाल्यांचे अॅडमिशन बीड शहराच्या ठिकाणी घेतले. मात्र गोरगरीबांच्या मुलांचे नुकसान होत असल्याने संतप्त गावकर्यांनी आज सकाळी शाळेला कुलूप ठोकले. या वेळी महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जोपर्यंत शाळेला शिक्षक दिले जात नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडण्यात येणार नसल्याचे सरपंच बिलाल पटेल यांनी म्हटले आहे. शिक्षकासाठी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, सीईओ यांच्याकडे अनेक वेळा खेटे घातले मात्र तरीही याची दखल संबंधित विभागाने घेतली नसलने शेवटी शाळेला कुलूप ठोकावे लागले, असे पटेल यांनी म्हटले. शाळेला कुलूप ठोकण्यासाठी महिला-पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.