Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeसंपादकीयराजकारण गढूळ झालं लोकशाहीत सामान्यांना स्थान किती?

राजकारण गढूळ झालं लोकशाहीत सामान्यांना स्थान किती?


समता, स्वातंत्र्य, बंधुता हा लोकशाहीचा मुळ पाया, यावरच लोकशाहीची इमारत उभी आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील जनता जात, पात, धर्म विसरुन स्वातंत्र्य संग्रामात विलीन झाली होती. येणार्‍या पिढयांना चांगलं जगता यावं. स्वातंत्र्याची गोड फळ प्रत्येकाला चाखता यावी, असे स्वप्न त्या वेळच्या स्वातंत्र्यसैनिकांची पाहीली होती. त्यांचे हे स्वप्न आज किती सत्यता उतरवले जात आहेत? स्वातंत्र्यनंतर देशातील जनता भुकी, कंगाल होती. पंडीत नेहरुंनी आधुनिक तंत्रज्ञानात मोठा विकास केला. उद्योग क्षेत्राला चालना दिली. त्यामुळे शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत उद्योगाचं जाळं पसरलं. ग्रामीण भाग शिक्षणात पुढे आणण्यात आला. रस्ते, दवाखाने, शासकीय कार्यालयासह अन्य बाबींचा विकास केला गेला. जो तळागळातील माणुस दारिद्रयात खितपत पडलेला होता. त्या माणसांना वर आणण्याचे स्वप्न यापुर्वीच्या थोरांनी आणि महात्म्यांनी पाहिले होते, त्यांचे हे स्वप्न पुर्ण झाले का? नेहरु, गांधी घराण्याचं राजकरणात जसं योगदान आहे. तसं देश घडवण्यात मोठं योगदान आहे हे मान्य करावं लागेल, पण आजचं राजकारण पाहता, गांधी घराण्याचा द्वेष केला जातो आणि त्यांचं कार्य पुसलं जात आहे, हे संकुचीत विचाराचं राजकारण म्हणावं लागेल, गांधी घराण्यानंतर राजकारणात वाजपेयी यांनी आपला ठसा उमटवला. वाजपेयी यांचा राजकीय वसाही संपवण्याचा प्रयत्न झाला तर नवल वाटू नये? राजकारण्यांनी राजकारण शुध्द पाण्यासारखं करण्या ऐवजी ते गढूळ केलं आहे. गढूळपणा हा राजकीय आरोग्यासाठी धोकादायक असतो.
राजकारणातील काबेवाजपणा
राजकारणाात आज तितका खरेपणा राहिला नाही. राजकारणाबद्दल तितकं कुणी चांगलं बोलत नाही. एखादा राजकारणी सोडला तर इतर राजकारणी लबाड असतात, असं सरळ-सरळ बोललं जातं, हे खरंही आहे. राजकारणातून समाजकारण झालं नाही. त्यामुळे लोकं राजकारणाला द्वेष देतात. पुर्वी निवडणुका विचारावर लढवल्या जात होत होत्या. आज विचार पुसल्या सारखे झाले. फक्त कागदावर आणि म्हणण्यापुरतेच विचार दिसतात. जो सगळ्यात लबाड, धुर्त आहे. अशांचा राजकारणात विजय होवू लागला. राजकारण्यांनी लोकांना मतदानासाठी पैशाची, पार्ट्याची लालूच दाखवली. त्यामुळे निवडून येण्यासाठी पैसे लागतात. ज्यांच्याकडे पैसा असतो, ते आज निवडून येवू शकतात हे समीकरण झालं. सर्वसामान्यांना लोक निवडून देत नाहीत. मंत्र्यासाठी थैल्या रिकाम्या कराव्या लागतात, तेव्हा कुठं मंत्री होता येतं. मंत्री, आमदार, खासदार हे जे लोकप्रतिनिधी असतात ते जनतेसाठी कमी आणि स्वहीत जास्त जोपासतात. जे जुने प्रस्थापीत पुढारी आहेत. त्याची संपत्ती मोठी अवाढव्य आहे. त्यांनी ही संपत्ती कुठून आणली याची चौकशी होत नाही. राजकारणातील एकनिष्ठपणा नाहीसा झाला. जिकडं फायदा तिकडं राजकीय पुढार्‍यांचा ओघ सुरु झाला. पुढारी नुसते आश्‍वासने देवून लोकांची दिशाभूल करु लागले. आश्‍वासनाची पुर्तंता केली जात नाही. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी म्हण राजकारणात प्रचलीत झाली. जो जास्त खोटं बोलतो तोच राजकारणात यशस्वी होतो. राजकारणाला भावनिक, धार्मिक रंग दिला जावू लागला. सरळ,सरळ, जाती,धर्माच्या नावाने मते मागितले जावू लागले. जाती, धर्मावरुन राजकारणात रणकंद माजू लागले. जाती वरुनच मंत्रीपद ठरविले जावू लागले. राजकारणात सरळ-सरळ जाती, धर्माचे सौदे करुन काही ठरावीक जाती, धर्माचे पुढारी त्यात आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेवू लागले. निवडणुका आल्या की, सरळ-सरळ दोन समाजात विभागणी केली जावू लागली. अशा पध्दतीची विभागणी करणे हा काहींचा राजकीय फायदा होत असला, तरी एकमेकांची मने दुषीत होत आहे, याचा विचार आजचे राजकारणी करत नाही. राजकारण्यांना समाजापेक्षा राजकारण महत्वाचं वाटू लागलं. त्यामुळे समाजाची विभागणी करत असतात. अशा राजकारणाला वेळीच पायबंद बसला नाही तर समाजाची वीण उसवून समाज सामाजीक दृष्या बाधीत झाल्याशिवाय राहणार नाही.
सत्ताधार्‍यांना विचाराची भीती
ज्यांना अनेक वर्ष सत्ता भोगायची असते. त्यांना आपल्या ताब्यातून सत्ता जावू नये, असचं वाटतं असतं. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा, बोलण्याचा,लिहण्याचा अधिकार आहे. सत्ताधारी कुठं चुकत असेल त्याला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार देशातील प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे. आज प्रश्‍न विचारणे हा धोका ठरू लागला. जो केंद्रातील सरकारला प्रश्‍न विचारेल, त्याला सत्ताधार्‍यांचे बगलबच्चे बाहेरचा रस्ता दाखवतात किंवा देशद्रोही म्हणुन त्याची अवहेलना करतात. सोशल मीडीयातून नको त्या, ‘ओकार्‍या‘ टाकल्या जातात. सत्तेच्या विरोधात बोलणार्‍यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन त्यांना कित्येक दिवस जेलमध्ये डांबले जाते. फादर स्टेन या ८४ वर्षीय वयोवृध्दाला जेलमध्ये डांबण्यात आले. काय तर ते केंद्राच्या सत्तेला आव्हान देत होते म्हणे, एक वयोवृध्द सत्तेला कसं आव्हान देईल? स्टेन यांचा शेवटी जेलमध्ये मृत्यू झाला. त्यांनी नेमका काय गुन्हा केला हे सिध्द न होताच त्यांना जेलमध्ये डांबून पोलिस मोकळी झाली होती. अशा कित्येक घटना आहेत, त्या बंद कोठडीत दडपण्यात आल्या. आंदोलन करणार्‍यांना वाईट पध्दतीने वागवले जाते. सत्तेच्या विरोधात आंदोलन करु नये अशी सत्ताधार्‍यांची धारणा असते. ज्या गोष्टी चुकीच्या होतात. त्या चुका दाखवणं म्हणजे तो देशद्रोह झाला का? पंजाब, हरियाना येथील शेतकरी आठ महिन्यापासून दिल्लीत आंदोलन करतात. त्यांची दखल जर केंद्र सरकार घेत नसेल, उलट त्यांनाच नक्षलवादी, खलिस्थानवादी म्हटले जात असेल तर हे चांगले लक्षण आहे का?. आपल्या भारतीय बांधवावर आपणच अन्याय करत नाही का? पंतप्रधान भलेही भाजपा पक्षाचे असले तरी ते देशाचे आधी असतात. नंतर पक्षाचे, त्यांना देशातील प्रत्येक माणुस सारखा असतो. प्रत्येक गोष्ट जर राजकीय चष्म्यातून पाहितली जात असेल तर ही राजनीती समाजाहिताची नसून तो एक हुकूमशाहीचा अजंडा आहे असं म्हणावं लागेल.
द्वेषाची पेरणी
मनात द्वेष ठेवून समाजात वागणारे आज ही जागो-जागी दिसून येतात. मग ते राजकारणी असो, किंवा कोणत्या ही क्षेत्रातील असोत. लढाई विचाराची असावी, विचाराची लढाई लढणारे कधीच मनात पाप ठेवून समाजात वावरत नाहीत. एका ताटात खाणारांचे विचार वेगवेगळे होते आणि आज ही अनेकांचे आहेत. विचार वेगळे असणारे कधी एकमेकांच्या जीवावर उठले नव्हते. आज काही तरी अजब होत आहे. नवं जातीय समीकरण काहींनी मांडायला सुरुवात केली. त्यातून बळी जात आहे. झुंडशाडी जन्माला आली. या झुंडशाहीने निरापराधांना मारले. भयाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. आजचं वातावरण पाहता,भविष्याची चिंता वाटू लागली. जाती, धर्माच्या नावाने दंगली घडवल्या जातात. दिल्लीत अशाच जाती,धर्माच्या आडून दंगल घडवण्यात आली होती, जाती,पातीची लढाई अगदी शिक्षण क्षेत्रात जावून पोहचली. ठरावीकांना जाणीवपुर्वक लक्ष्य करण्याचं काम काही जातीय मंडळी करु लागली. दिल्लीच्या विद्यापीठात पोलिस घुसवण्या पर्यंत ते तेथील विद्यार्थ्यांना मारहाण करण्या पर्यंत मजल जाते. ज्या महात्मा गांधीचा आदर संपुर्ण जग करत आहे. त्याच गांधींच्या पुतळ्याला गोळ्या मारण्याचं पाप केलं जात आहे, तरी सत्ताधारी उघड्या डोळ्याने हे पाप पाहत आहे. नाथूरामचा उदोउदो करणारे संसदेत जातात. संसद हे देशातील लोकांचं प्रतिनिधीत्व करणारं मंदीर आहे. आज ह्याच मंदिराला उतरती कळा आली. संसदेत किती प्रमाणात कामकाज होतं? संसदेतील राडा पध्दत बघितल्यानंतर शरमेनी मान खाली जावू लागली.
गरीबी, बेकारी, महागाई वाढली
गरीबी, हाटावचा नारा पोकळ ठरला. गरीबी हटण्याऐवजी ती वाढतच आहे. लॉकडाऊनमध्ये गरीबांचं प्रमाण वाढलं. लाखो कामगारांचे रोजगार गेले, हे कामगार आज बेरोजगारीचा ‘कटोरो’ घेवून बसलेले आहेत. त्यांना भविष्यात काम मिळेल की,नाही हे सांगता येत नाही. महागाईने सर्वसामान्यांना जगणं मुश्किल करुन ठेवलं. इंधनाचे दर दोन,चार दिवसाला वाढत असतात. चुकीच्या नोटबंदीने कित्येकांचा बळी गेला. हक्काचे पैसे बदलण्यासाठी चोरा सारख्या रांगा लावण्याची वेळ देशवासियावर आली होती. या रांगेत एक ही करोडपती उभा राहिला नाही, हे आश्‍चर्यकारक होतं. बड्या लोकांचे पैसे बँकांनी कसे बदलून दिले, याचं आज ही कोडं उलगडलं नाही. कोरोनाचा संसर्ग अजुन संपलेला नाही. ऑक्सीजन न मिळाल्याने कित्येकांचे प्राण गेले. तरी राज्यकर्ते म्हणतात. ऑक्सीजन विना एक ही रुग्ण मरण पावला नाही. गंगा नदी पवित्र झाली नाही, पण त्यात मृतदेहाचा खच पडला होता, या मृतदेहाने गंगानदी अपवित्र झाली. गंगेने सरकारचा बुरखा फाडला. सरकार किती कर्तव्य दक्ष आहे हे जगाला दाखवून दिलं. आज चलती आहे ती बड्या लोकांची, यात सर्वसामान्यांना भाव राहिला नाही. उद्योगपतीचं हित जोपासलं जातं. सर्वसामान्य फक्त एक दिवस मतदानापुरताच महत्वाचा ठरू लागला. तो ही काही दिवसांनी ठरतो की, नाही अशी भीती वाटू लागली, कारण ईव्हीएम मशीन बाबत लोकांना शंका आहे. स्वातंत्र्याला ७४ वर्ष झाली. एका पिढीचं अंतर आपल्या स्वातंत्र्याने कापलं. राजकारण्यांनी देश कशीच घडला नाही तो घडवला विचारवंतानी, थोरांनी, महात्म्यांनी, त्यामुळे राजकारण्यांनी चांगलं करता आलं नाही तर निदान वाटोळं तरी करु नये? सामान्यांना न्याय मिळत नाही. तो तळागळातच आहे. स्वातंत्र्य काही ठरावीकासाठी नाही, ते देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. देशात समता, स्वातंत्र्य,बंधूता, न्याय या गोष्टी शंभरटक्के जेव्हा रुजतील तेव्हाच खर्‍या अर्थाने आपण धान्य होतोल, ते खरं स्वातंत्र्य असेल!!

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!