टायर फुटल्याने बस खांबाला धडकली; डीझेलच्या टाकीचा स्फोट, बस आगीच्या विळख्यात, 12 ते 15 जण बचावले
नागपूर (रिपोर्टर): नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला असून अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी अपघातानंतर बाहेर पडले. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. बुलढाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली आहे. समृद्धी महामार्गावर ही बस नागपूरहून पुण्याकडे येत होती. बस मध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जात असताना बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर बसने पेट घेतला. बस मध्ये असणार्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला आला त्यामुळे प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून घटना हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे.
समृद्धी महामार्गावर वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बनवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अपघात स्थळाची पाहणी केल्यानंतर अपघाताची भीषणता जाणवली असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते सध्या घटनास्थळाची पाहणी करत असून घटनेची माहिती घेत आहे. मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार श्वेता महाले, घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी उपस्थितांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले आहेत. ते घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे हे चालकाच्या हातात असते. या प्रकरणी सविस्तर चौकशी होईलच आणि त्यावेळी सत्य समोर येईलच. मात्र 25 प्रवशांचा मृत्यू झालाय, ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटल आहे. ते घटनास्थळावर पोहोचले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकत्र बुलढाणा येथे अपघात झालेल्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. मुख्यमंत्री सकाळी 9.30 पर्यंत ठाणे येथील निवासस्थानाहून एअरपोर्ट कडे निघतील. आधी विमानाने छत्रपती संभाजीनगर आणि तिथून पुढे बुलढाणा गाडीने जातील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणार्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.