बीड (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यात मराठवाडयामध्ये सर्वात कमी 2.5 एवढे वनक्षेत्र आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी 33 टक्के वनक्षेत्र असणे अपेक्षीत आहे. मात्र केवळ 2.5 टक्के क्षेत्र असतांनाही बीड जिल्ह्यात वृक्षतोड होते. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे वृक्ष तोडीबाबत व्हिडीओ फोटो सह वनविभागाला तक्रार केली. त्यानंतर वनविभागाने केवळ पंचनाम्याच्या फार्स घातला. त्यानंतर कसलीही कारवाई केली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यातील कानडीघाट येथील शेतकरी लक्ष्मण ज्ञानोबा कवडे व हनुमंत ज्ञानोबा कवडे यांच्या शेतातील 25 वर्ष जुने असलेली चिंच व कडुलिंबाची दहा ते बारा झाडे अज्ञात व्यक्तीने तोडले होते. या प्रकरणी लेखी तक्रार जिल्हाधिकारी व वन परिक्षेत्र अधिकारी तसेच बीडच्या तहसिलदारांकडे केली होती. मात्र या प्रकरणी कसलीही कारवाई केली नाही. यानंतर डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया-समोर उपोषण केल्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्यांनी आठ जुलै रोजी पंचनामा केला. मात्र अद्यापपर्यंत कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही.