शिंदे यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याची मागणी
बीड (रिपोर्टर): शहरातील जिजाऊ मॉ साहेब मल्टिस्टेटमध्ये कोटट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी संचालक मंडळाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. ठेवीदारांचे पैसे अडकल्याने ठेवीदार चांगलेच अडचणीत सापडले असून ठेवीदारांनी आपल्या पैशासाठी आज आप्पासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. शिंदे यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी, या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बीड शहरातील राजीव गांधी चौक भागात असलेल्या जिजाऊ मॉ साहेब मल्टिस्टेटमध्ये शेकडो नागरिकांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या. या बँकेचा दिवाळा निघाला. बँकेत करोडो रुपयांचा अपहार झाला. या प्रकरणी बबन शिंदेंसह संचालक मंडळाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल झाल्यानंतर ठेवीदारांच्या पैशाचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला असून आप्पासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ठेवीदारांनी मोर्चा काढला होता. बबन शिंठदे व अनिता शिंदे व त्यांच्या कुटुंबियाने मागील दहा वर्षात खरेदी केलेल्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात, या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा यासह इतर मागण्या ठेवीदारांच्या आहेत. या मोर्चामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.