बीड : डॉक्टर मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी वस्तूचा मारा करुन खून केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी भेट देवून पंचनामा करत मृतदेह जिल्हारुग्णालयात शवविच्छदनासाठी आणला.
याबाबद अधिक असे की, बीड शहरातील अंकुश नगर भागात राहणार्या कुलकर्णी परिवारातील मुलगा सुधिर सुरेश कुलकर्णी हा 2010 मध्ये बीएएमएस मध्ये पास झाला होता. तो गेल्या तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत होता, परंतु यात त्याला अपयश आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. यात त्याने आज मध्यराञी जन्मदात्या बापाचा (सुरेश काशीनाथ कुलकर्णी वय 70) खून केला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. सुरेखा कलकर्णी वय 62 यांच्या फिर्यादीवरुन मुलगा सुधिर कुलकर्णी वय 38 याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरा सुरु होती. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड हे करत आहेत.