मोर्चेकर्यांचे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे सुरू
अंबाजोगाई (रिपोर्टर): मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाराच्या घटनांबरोबर महिलांची काढण्यात आलेल्या नग्न धिंडीचा निषेध करण्यासाठी आज अंबाजोगाईकर एकवटले. रस्त्यावर उतरून हजारो महिला-मुलींनी या घटनेचा निषेध नोंदवत मुकमोर्चा काढला. हा मूकमोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघाला तो थेट उपजिल्हाधिकारी कार्यालयावर जावून धडकला. त्यठिकाणी उपस्थित मोर्चेकर्यांनी मणिपूर घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे.
देशातले मोदी सरकार जगज्जेते विश्वगुरू म्हणून डांगोरा पिटवत असताना गेल्या ऐंशी ते नव्वद दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. अनेकांच्या हत्या झाल्या आहेत. प्रचंड जाळपोळ झाली आहे. महिलांना हिन वागणूक दिली जात आहे. अशा परिस्थितीत हा हिंसाचार रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी मणिकपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली, महिलांवर बलात्कार करण्यात आले. सदरचा प्रकार हा अत्यंत संतापजनकअसल्याने या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली. थेट सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले. त्यावेळी कुठे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल ऐंशी ते नव्वद दिवसानंतर या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली. या घटनेचे पडसाद काल महाराष्ट्राच्या विधानसभेतही उमटले. आज बीड जिल्ह्यात या घटनेचा निषेध होत असून अंबाजोगाईमध्ये हजारो महिलांच्या उपस्थितीत मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ मूकमोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून हा मोर्चा सावरकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावर जावून धडकला. मोर्चेकर्यांनी हातामध्ये निषेधाचे फलक आणि काळ्या फिती लावल्या होत्या. मणिपूर घटनेच्या निषेधार्थ मूकमोर्चा झाल्यानंतर आंदोलक धरणेवर बसले. या मोर्चामध्ये रोटरी क्लब, मानवलोक, मनस्वीनी संघटनांसह समाजसेवी संस्था, राजकीय पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली होती. माजी अ. पृथ्वीराज साठे, पापा मोदी अनिकेत लोहिया, अनंत जगतकर यांच्यासह आदी मान्यवर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.